नांदेड : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तर सरकारकडून मात्र 2 जानेवारीपर्यंतची वेळ मागून घेण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यभरात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजाने आता 24 डिसेंबरपर्यंत शांतता ठेवावी, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. पण त्यांच्या या आवाहनाला मराठा बांधव दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा आंदोलकांकडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यात येत आहे. परंतु, आता तर नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीने मराठा आरक्षण मिळावे, यासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक वार्ता समोर आली आहे. (student of class 9th ended her life for Maratha reservation)
हेही वाचा – छगन भुजबळांनी मनोज जरांगेंवर केलेल्या टीकेवर प्रकाश आंबेडकर म्हणाले; “राजकीय…”
नांदेड जिल्ह्यातील सोमेश्वर येथे राहणाऱ्या एका विद्यार्थीने आज आपली जीवनयात्रा संपवली. कोमल बोकारे असे विद्यार्थिनीचे नाव असून ती इयत्ता नववीत शिकत होती. आत्महत्येपूर्वी कोमलने चिठ्ठी लिहिली असल्याचे तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोमलचे वडील काराम बोकारे हे अल्पभूधारक शेतकरी आहे. ते एक एकरात शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कोमल व्यतिरिक्त त्यांना आणखी चार मुली आहेत. कोमल ही त्यांची दुसऱ्या नंबरची मुलगी होती.
कोमलने काल गुरुवारी (ता. 16 नोव्हेंबर) सकाळी राहत्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील रुममध्ये गळफास घेतला. ही बाब समजल्यानंतर कुटुंबियांनी तिला तात्काळ राहटी येथील खाजगी रुग्णालयात नेले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी मध्यरात्रीच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या मराठा आरक्षणासाठी गावागावांमध्ये साखळी उपोषण सुरू आहे. कोमल देखील या उपोषणाला बसायची. पण आता तिने अचानक असे धक्कादायक पाऊल उचल्याने गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. “मराठा समाजाला आरक्षण लवकर द्यावं. माझं बलिदान व्यर्थ जाऊ नये. आई अण्णा मला माफ करा,” अशी चिठ्ठी कोमलने आत्महत्येपूर्वी लिहिली होती.
पंरतु, कोमलने मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलल्याचे समजताच सोमेश्वर येथील ग्रामस्थांनी आकम्रक होत आंदोलन स्थळी मृतदेह नेऊन शासनाचा निषेध केला. जो पर्यंत प्रशासन या घटनेची दखल घेत नाही तो पर्यंत मृतदेहावर अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका गावाकऱ्यांनी घेतली होती. मात्र, उपजिल्हाधिकारी विकास माने आणि तहसीलदार संजय वरकड यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यानंतर या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तर कोमलच्या चार दिवस आधीच म्हणजे सोमवारी (ता. 13 नोव्हेंबर) नांदेडमधील एका तरुणाने विष प्राशन करत आपले जीवन संपवले होते. दाजीबा रामदास कदम असे आत्महत्या केलेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव होते.