जेएनयूच्या विद्यांर्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा मुंबई,पुण्यात तीव्र निषेध

jnu protest

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) काही बुरखा घातलेल्या तरुणांनी रविवारी रात्री हल्ला केला. या हल्ल्यात जेएनयु विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आयशे घोष यांच्यासह अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा मुंबई,पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया तर पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला.

मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला. तर जेएनयुच्या विद्यार्थांवर हल्ला झाल्यानंतर मध्यरात्री पुण्यात एफटीआयचे तरूण एकवटले. मध्यरात्रीची वेळ असूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या मार्चमध्ये सहभागी झाले होते. शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करण्यात आले. यावेळी हल्ल्याचा संशय असेलेल्या अभाविप विरोधात घोषणा देण्यात आल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तर मुंबईत आज संध्याकाळी हुतात्मा चौकात या हल्ल्याचा निषेध करण्यात येणार आहे. तर पुण्यात संध्याकाळी ७ वाजता गुडलक चौकात अभाविपचा निषेध करण्यात येणार आहे. न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सभा होईल.

कँपसमध्ये तणाव कायम

सध्या देशभरातून जेएनयूत विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला जात आहे. तर विद्यापीठाच्या कँम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. रात्रभर कॅम्पस,एम्स तसेच पोलीस मुख्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी एम्समध्येच धरणे आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला. दरम्यान, जेएनयू कॅम्पसमध्ये पोलिसांनी रात्री फ्लॅग मार्च केला.

ट्विटरवरून व्यक्त केला निषेध

परराष्ट्रमंत्री एस.शंकर आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जेएनयूतील घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. हिंसाचाराची जी दृष्ये समोर आली आहेत ती भीतीदायक आहेत. विद्यापीठात अशा घटनेला थारा असता नये. विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित असण्याची गरज आहे, असे सीतारामन यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.