घरताज्या घडामोडीअशोक चव्हाणांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून शिवसेना सोडली, सुभाष साबणेंचा आरोप

अशोक चव्हाणांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून शिवसेना सोडली, सुभाष साबणेंचा आरोप

Subscribe

शिवसेना सोडावी लागत असल्यामुळे अतिशय वाईट वाटत असल्याचे सांगताना साबणे यांना अश्रू अनावर झाले.

शिवसेना नेते सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेना सोडताना सुभाष साबणे यांना अश्रू अनावर झाले होते. आपण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या एकाधिकारशाहीमुळे शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचा आरोप केला आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी सुभाष साबणे यांचे नाव जाहीर केलं आहे. साबणे शिवसेनेत नाराज होते अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना बैठक झाली आणि साबणे यांची भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत चर्चा झाली. कार्यकर्त्याला केलेल्या मारहाणीमुळेही सुभाष साबणे दुखावले होते. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर याच्या निधनामुळे जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

शिवसेना नेते सुभाष साबणे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. साबणे यांनी म्हटलं आहे की, मी १९८४ पासून शिवसेनेत काम केलं आहे. गेल्या ६ निवडणुका शिवसेनेच्या नावावर निवडून आलो आहे. शिवसेनेमध्ये इतके वर्ष काढले आहेत. परंतु काँग्रेस नेते अशोक चव्हाणांच्या एकाधिकारशाहीमुळे शिवसेना सोडावी लागली. शिवसेना सोडावी लागत असल्यामुळे अतिशय वाईट वाटत असल्याचे सांगताना साबणे यांना अश्रू अनावर झाले.

- Advertisement -

साबणे यांनी पुढे म्हटलं आहे की, मला बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खूप प्रेम दिले. मला हवं ते आणि मागेल ते त्यांनी दिलं आहे. परंतु सर्वात वाईट एका गोष्टीचे वाटले ते म्हणजे माझ्या कार्यकर्त्याला आणि शिवसैनिकालाला तुडवलं आहे. महाविकास आघाडीमुळे काँग्रेस सत्तेत आहे. काँग्रेस संपली होती परंतु उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळे काँग्रेस सत्तेत आली आहे. हे काँग्रेस विसरत असल्याचे सुभाष साबणे यांनी म्हटलं आहे.

शिवसेना संपवण्याचा प्रयत्न

काँग्रेस नेते अशोक चव्हाण नांदेडमध्ये शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सज्जन आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फोडाफोडी करण्यात तरबेज लोकं आहेत. यामुळे शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे माझ्यासारखेच अनेक लोकांना वाटत आहे की, शिवसेनेने महाविकास आघाडीमधून बाहेर पडावं. आताच्या निवडणुकीत काँग्रेस नाहीतर राष्ट्रवादीला मतदान करा असे म्हणायचे आणि नंतरच्या निवडणुकीमध्ये कोणाला मतदान द्या असे म्हणाये? असा प्रश्न साबणे यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

साबणेंना भाजपकडून उमेदवारी

नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचे जाहीर झाले आहे. अशातच आता देगलूरमधील शिवसेनेचे नाराज नेते माजी आमदार सुभाष साबणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी सुभाष साबणे यांना उमेदवारी देखील जाहीर केली आहे. साबणेंच्या भाजपा प्रवेशामुळे आता ही निवडणूक चांगलीच चुरशीची होणार असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा : शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपाकडून देगलूर विधानसभेसाठी उमेदवारी


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -