मुंबई : कल्याणमधील विजय तरुण मंडळाचा देखावा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लोकशाहीचे चारही खांब प्रचंड दबावाखाली आहेत, असा देखावा कल्याणमध्ये साकारण्यात आला आहे. त्यावरून आता राजकारण रंगले आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला थेट इशाराच दिला आहे.
हेही वाचा – हाच तुमचा सनातन धर्म का? नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरून उदयनिधींचा भाजपला सवाल
विजय तरुण मंडळाने आपल्या गणेशोत्सावातील देखाव्यात लोकशाहीचे चारही खांब प्रचंड दबावाखाली आहेत. केंद्रातील सरकार म्हणजेच भाजपाकडून दबाव टाकला जात आहे. विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे यांच्यावर कसा दबाव टाकला जात आहे, असा देखावा कल्याणमध्ये साकारण्यात आला आहे. त्यामुळे कल्याणच्या विजय तरुण मंडळाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या मंडळाचे विश्वस्त विजय साळवी हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आहेत.
ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी ट्वीट करत, लोकशाहीची ऐसीतैशी सुरू असताना आता गणेशोत्सवाचे जन्मस्थान असलेल्या महाराष्ट्रात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही टाच आणली जात आहे, अशी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेप्रणित गणेशमंडळांवर नोटिशीचे जाळे फेकून गळचेपी करण्याचे असले प्रकार अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव लोकांना शहाणे करण्यास सुरू केला होता. आज त्यांचा वारसा चालवणाऱ्यांना कोणी रोखू पाहत असतील तर ते कर्माने ब्रिटिशच ठरतात, असे त्यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – …म्हणून महिला आरक्षण विधेयकास सगळ्यांचेच समर्थन, ठाकरे गटाचा भाजपासह काँग्रेसवर निशाणा
गेल्यावर्षीही देखाव्यावरून वाद
विशेष म्हणजे, कल्याणच्या या विजय तरुण मंडळाने मागच्या वर्षीही असाच वादग्रस्त देखावा साकारल्याने पोलिसांनी तो जप्त केला होता. शिवसेनेतील बंडावर आधारित हा देखावा होता. या देखाव्यात शिवसेना म्हणून मोठा वृक्ष दाखवण्यात आला होता. वृक्षाला फळे लागल्यानंतर ती इतर पक्षी खातात अशा आशयाचा हा देखावा होता. त्यावर पोलिसांनी आक्षेप घेत देखावा जप्त केला होता. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण न्यायालयात गेले होते. परंतु न्यायालयाच्या सशर्त परवानगीने तो सर्वांसाठी खुला करण्यात आला होता.