घरमहाराष्ट्रआता अर्थमंत्र्यांचे विरोधकांना झिंगाट उत्तर; राज ठाकरेंवरही साधला निशाणा!

आता अर्थमंत्र्यांचे विरोधकांना झिंगाट उत्तर; राज ठाकरेंवरही साधला निशाणा!

Subscribe

जयंत पाटील यांनी सैराटमधल्या झिंगाट गाण्याच्या आधारावर सत्ताधाऱ्यांवर टीका केल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांनी देखील त्याच गाण्याच्या चालीवर विरोधकांवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना ‘सैराट’ चित्रपटातील गाजलेल्या ‘झिंग झिंग झिंगाट’ या गाण्याचा आधार घेतला होता. आज अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना याच झिंग झिंग झिंगाट गाण्याचा आधार घेत विरोधकांना जशास तसे उत्तर दिले. मात्र विरोधकांवर टीका करत असताना सुधीर मुनगंटीवार यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. आपल्या गाण्यात एका कडव्यात राज ठाकरे आणि राहुल गांधी यांचा उल्लेख सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेलं सैराट!

उरात होतीय धडधड, ज्यांची सत्ता क्षणात गेली,
जनतेच्या रागाची झाली बाधा, घड्याळ हातात फुटून गेली,
समदं झ्याक झालंया, कमळ-धनुष्य बाण फुलून आलंया,
आरं राहुलच्या खेम्यातं, राष्ट्रवादीच्या कोमातं.. राज ही रडतोया,
झालंय झिंग झिंग झिंगाट….
झिंग झिंग झिंगाट….
झिंग झिंग झिंगाट…

- Advertisement -

चल विकास करुया, साथ मोदींची आहे,
थकलेले विरोधक कसं टुकुर टुकुर पाहे,
त्याला थकत राहू दे, की बघत राहू दे,
प्रगतीचं हे प्रेम ही आहे बुलेट ट्रेन,
आता बुंगाट जाऊदे, जाऊदे.. झिंग झिंग झिंगाट

समद्या राज्याला झालीया, आमच्या विजयाची घाई,
शिवधनुष्य सोबत येणार ही शिवशाही,
छत्रपतीच्या नावानं आणि आदरभावानं
चालवू हे शासन, उत्तम प्रशासनं, जनतेला देऊनी
गाऊया, झिंग झिंग झिंगाट… झिंग झिंग झिंगाट

- Advertisement -

‘मागील सरकारपेक्षा आत्ताची परिस्थिती चांगली’

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांनी अर्थसंकल्पावर उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. राज्याची आर्थिक स्थिती विरोधक सांगतात त्याप्रमाणे नक्कीच नसून ती चांगलीच असल्याचा दावाही त्यांनी केला. विरोधक केवळ विरोध करण्यासाठीच टीका करत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत आणि आघाडी सरकारच्या तत्कालीन स्थितीपेक्षा आत्ताची स्तिथी चांगली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. २०१४ -१५ च्या अर्थसंकल्पात राज्याचा ऋणभार २८ टक्के होता. तो आता केवळ १५ टक्यांवर आला असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.


हा व्हिडिओ पाहा – पाहा जयंत पाटलांचं विधानसभेतच झिंग झिंग झिंगाट!

राज्यात उलाढाल वाढल्याचा दावा

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सची करण्याचा सरकारचा मानस असून यासंदर्भात काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. ‘आयफोन, मायक्रोसॉफ्ट, गुगल या कंपन्यांमध्ये आज एक ट्रिलियन डॉलरची उलाढाल होत आहे. या कंपन्यांमध्ये भारतीय लोक काम करतात. आमच्यात शक्ती कमी नाही, ज्ञान कमी नाही, नीती आयोगाच्या बैठकीत मोदींनी भारताची पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था करु, असा संकल्प सोडलेला आहे’, असं अर्थमंत्री म्हणाले.

‘आकडेवारी संकेतस्थळावर टाका’

मात्र, या उत्तरावर विरोधकांनी आक्षेप घेतला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘गुंतवणूक आणि रोजगाराबाबतीत जे आकडे सरकारने दिले आहेत, त्याची इत्थंभूत माहिती दिलेली नाही. गुंतवणूक आणि रोजगाराची जिल्हानिहाय आकडेवारी संकतेस्थळावर टाकावी’, अशी मागणी त्यांनी केली. ‘पुढील चार ते पाच महिन्यांत ही आकडेवारी संकेतस्थळावर टाकू’, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. तर जयंत पाटील यांनी मुनगंटीवार यांच्या भाषणाचे कौतुक केले. मात्र, ‘अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेवर आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले नसल्याचा’, आरोप पाटील यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -