घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअहमदनगर जिल्ह्यात पुरे‘पूर‘ पाऊस

अहमदनगर जिल्ह्यात पुरे‘पूर‘ पाऊस

Subscribe

अहमदनगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील भंडारदरा व मुळा धरणात पावसामुळे नव्याने पाण्याची आवक सुरू झाल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भंडारदरा धरण ५० टक्के भरले आहे. गोदावरी नदीतून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाल्याने कोपरगाव शहरासह नदीकाठच्या 40 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोदावरी नदी पात्रात नांदूर मध्यमेश्वर धरणातून ७९ हजार ८४८ क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. अकोले तालुक्यात पावासामुळे लहान-मोठे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. बेशिस्त पर्यटकांमुळे वन विभागाने नोव्हेंबरपर्यंत ट्रेकिंगसह मुक्कास मनाई केली आहे.

नाशिक जिल्ह्यासह धरणक्षेत्रात संततधार पाऊस सुरु असल्याने गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. कोपरगाव शहर व बेट भागाला जोडणारा छोटा पूल अर्थात राष्ट्रसंत जनार्दनस्वामी मौनगिरी सेतू गोदावरी पाण्याखाली गेला आहे. या पुलावरुन वाहतूक बुधवारी (दि.१३) सकाळपासूनच बंद करण्यात आली आहे. पुराचे पाणी बघण्यासाठी वाढत असल्याने अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

- Advertisement -

गोदावरी नदीपात्रातून ८० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु असून, पाणी जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत आहे. गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने प्रशासनाने कोपरगाव तालुक्यातील कोपरगावसह नदीकठाच्या ४० गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोपरगाव शहरातील काही नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदार आशुतोष काळे यांनी आपत्ती व्यवस्थापन बैठक घेऊन अधिकार्‍यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अकोले तालुक्यात बलठणसह ५ धरणे ओव्हर फ्लो

अकोले तालुक्यात संततधार पाऊस सुरु असल्याने रतनवाडी येथे सर्वाधिक साडेबार इंच पावसाची नोंद झाली. लहान-मोठे नदी, नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. मुसळधार पावसामुळे मुळा, प्रवरा, आढळा, कृष्णावंती या नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत. मुळा पाणलोट क्षेत्रातील बलठण, देवहंडी, कोथळे, आंबीत, पिंपळगाव खांड, वाकी, घाटघर, टिटवी, पाडोशी, सांगवी हे जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

- Advertisement -

ढगफुटीसदृश्य पावसामुळे रस्ते, भातआवणीतील शेतीचे बांध यांचे खूप नुकसान झाले. काही ठिकाणी रस्त्यावर दरडी कोसळल्या, तर अनेक रस्ते, फरशी पूल, मोर्‍या पाण्याखाली गेल्या आहेत. कुमशेत, केळी-कोतूळ घाटातील दरड कोसळल्याने धामणवन, केळी, कुमशेत ते फोफसंडीसह पुणे जिल्हा सीमेलगतच्या २५ गावांचा संपर्क काहीकाळ तुटला होता. दिवसभर बारीतील चिखल हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु करुन रस्ता मोकळा करण्यात आला. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गेल्या २४ तासांत रतनवाडीत ३१२ मिलीमीटर, घाटघर १४६, भंडारदरा १२७ आणि वाकीमध्ये ९३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

धरणांमधील पाणीसाठा

भंडरादरा जलाशयात बुधवारी सकाळी 5537 (50.16टक्के) पाणीसाठा होता. 552 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली. निळवंडे धरणात 4605 (55.35) दशलक्ष घनफूट, मुळा धरणात 10703 (41.78टक्के) दशलक्ष घनफूट साठा आहे. आढळामध्ये 705 (66.51 टक्के) दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -