मुंबई : भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखर वापरात येत असते. त्यामुळे साखरेच्या किंमतीत वाढ झाली की, सामान्य माणसाला तीच गोड साखर कडू वाटू लागते. बाजारांमध्ये साखरेचा तुटवडा निर्माण झाली की, साहाजिकच त्यांच्या किंमतीत देखील वाढ झालेली पाहायला मिळते. पण आता नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार भारतात यंदा 330 लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे साखरेचा देशामध्ये सुमारे 275 लाख मेट्रीक टन खप होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये देशात साखरेच्या किमतीत 2 टक्क्यांपेक्षा कमी वार्षिक महागाई दर राहिला असल्याची माहिती देखील केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.
हेही वाचा – ‘कांदा खरेदीचा निर्णय केवळ धूळफेक’; काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
भारतात प्रत्येक सणाच्यावेळी गोड पदार्थ बनवले जातात. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात साखरेचा वापर करण्यात येतो. तर आता सर्वच महत्त्वाचे सण लागोपाठ येणार असल्याने साखरेच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. ज्यामुळे आता ऑगस्ट 2023 या महिन्यासाठी 2 लाख मेट्रिक टन अतिरिक्त कोट्याचे नियतवाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी बाजारांमध्ये अतिरिक्त साखर मागविण्यात येणार आहे. ज्यानंतर साखरेची किंमत निश्चित करण्यात येईल. तसेच, यंदाच्या चालू हंगामात इथेनॉलच्या उत्पादनासाठी 43 एलएमटी साखर वळविल्यानंतर भारतात 330 एलएमटी साखर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यांतील 275 लाख मेट्रीक टन साखरेचा देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी खप होऊ शकतो, असेही सांगण्यात येत आहे.
सध्या देशात चालू साखर हंगाम 2022-23 च्या उर्वरित महिन्यांसाठी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी भारताकडे पुरेसा साखरेचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे या हंगामाच्या अखेरपर्यंत म्हणजे 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 60 लाख मेट्रीक टन (अडीच महिन्यांसाठी साखरेची मागणी पूर्ण करण्यासाठी पर्याप्त) साखर उपलब्ध असेल, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. साखरेच्या किमतीतील अलीकडील वाढ लवकरच योग्य स्तरावर येईल. पुढील हंगामापूर्वी जुलै-सप्टेंबर दरम्यान दरवर्षी किमती वाढतात आणि नंतर ऊस गाळप सुरू झाल्यावर कमी होतात. त्यामुळे साखरेची दरवाढ अत्यंत नाममात्र आणि अल्प कालावधीसाठी असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.