मुंबई : गेल्या तीन ते चार वर्षात साखर उद्योग अडचणीत आल्याने हप्ते वसुलीवर परिणाम झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारने आता साखर विकास निधीतून देशातील साखर कारखान्यांना दिलेल्या अकरा हजार कोटींपेक्षा अधिक कर्जाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील जादा व्याजाचे 800 कोटी रूपये माफ केल्याने कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राने घेतलेल्या या निर्णयाने 179 सहकारी कारखान्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये बहुसंख्य कारखाने हे महाराष्ट्रातील आहेत. (Sugar Factory Big relief for sugar factories Eleven thousand crore loan reconstruction from the Centre)
हेही वाचा – Sharad Pawar : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पवारांकडून जेवणाचे निमंत्रण; अजितदादा जाणार?
केंद्रामार्फत देशातील साखर कारखान्यांना साखर विकास निधी अंतर्गत कमी व्याज दरात कर्ज दिले जाते. मशिनरी अधुनिकीकरण, उस विकास, इथेनॅाल प्रकल्प, विस्तारीकरण, नवीन साखर कारखाने उभारणी करण्याकरीता हे कर्ज दिले जाते. दोन टक्के कमी व्याज दराने कर्ज मिळत असल्याने या कर्जाची मागणीही मोठी असते. आतापर्यंत 11,339 कोटी रूपयांचे कर्ज केंद्राने केले आहे. पण गेल्या तीन ते चार वर्षात साखर उद्योग अडचणीत आल्यामुळे हप्ते वसुलीवर परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर आता कारखान्यांना दिलेल्या कर्जाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
पहिली दोन वर्षे हप्ते न भरण्यास मुभा
सध्या कारखाने आर्थिक अडचणीत असल्याने शेतकऱ्यांची बिले देणेही मुश्कील झाले आहे. कर्जाचा डोंगर वाढल्याने हप्ते भरणे अवघड झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राने घेतलेल्या या निर्णयाने कारखान्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. कारण केंद्राकडून मिळालेले कर्ज साखर कारखान्यांना सात वर्षात फेडायचे आहे. विशेष म्हणजे यातील पहिली दोन वर्षे हप्ते न भरण्यास मुभा मिळणार आहे. यामुळे कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा – Congress : नाना पटोलेंवर पदाधिकारी नाराज; 12 सदस्य पक्षश्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला
साखर कारखान्यांची आकडेवारी
लाभार्थी साखर कारखाने – 179
एकूण कर्जवितरण – 11,339 कोटी
आतापर्यंतची वसुली – 8,851 कोटी
थकबाकी – 2,488 कोटी
जादा व्याजाची रक्कम – 797 कोटी