सुजितसिंह ठाकुर होणार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते?

sujitsingh thakur

भाजप खासदार नारायण राणे यांना पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात आणून त्यांना भाजप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते बनवणार अशी चर्चा सुरू होती. मात्र आता विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपचे प्रदेश महामंत्री आणि विधान परिषदेतील आमदार सुजितसिंह ठाकुर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सोमवारी किंवा मंगळवारी त्यांच्या नावाची घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर महिन्यात काढलेल्या महाजनादेश यात्रेचे ठाकुर प्रमुख होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद विदर्भाकडे असल्याने आता विधान परिषदेतील विरोधीपक्षनेतेपद मराठवाड्याला देण्याचे पक्षाने निश्चित केल्याचे कळते.


हेही वाचा – चहा दिनाच्या दिवशी तरी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकायला नको – मुख्यमंत्री


उस्मानाबादमधील परांड्याचे ठाकुर यांची पंकजा मुंडे यांचे समर्थक अशी ओळख होती. मात्र, मधल्या काळात त्यांनी फडणवीस यांच्या गोटात जाणे पसंत केले. त्यामुळे फडणवीस यांनी ठाकुर यांची शिफारस पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे केली. ठाकुर यांच्या नावाला शाहांनी मान्यता दिल्याचे कळते. भाजपचे प्रदेशाध्यक्षपद चंद्रकांत पाटलांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्राकडे आहे. तर फडणवीस यांच्या निवडीने विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपद विदर्भाला मिळाले आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मराठवाड्याला देण्याचा पक्षाने निर्णय घेतला आहे.