घरमहाराष्ट्रअंतिम संस्काराचे पॅकेज पुरवणारी अनोखी कंपनी, हर्षोल्हासासह होईल शेवटही सुखांत

अंतिम संस्काराचे पॅकेज पुरवणारी अनोखी कंपनी, हर्षोल्हासासह होईल शेवटही सुखांत

Subscribe

मुंबई – ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते,’ सुरेश भटांची ही गझल आयुष्याच्या वेदनेचा हुंकार आहे. पण मरणानंतर खरंच सुटका होते का, असा प्रश्न गेल्या काही वर्षांत निर्माण झाला आहे. कारण, बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्याच मरणाचं सरण रचून ठेवण्याची वेळ वृद्धांवर ओढावली आहे. अशा वृद्धांना आणि इतर गरजूंना मदत करण्यासाठी सुखांत अंतिम संस्कार प्रायव्हेट लिमिडेट (Sukhant Funeral Mgmt Pvt.Ltd) ही एक अनोखी कंपनी पुढे आली आहे. मरणानंतरच्या सर्व विधी या कंपनीच्या माध्यमातून पुरवण्यात येतात. यामध्ये चार खांदे देणाऱ्या माणसांपासून अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणाऱ्या पुरोहितापर्यंत सर्व सोय ‘सुखांत’कडून केली जाते.

सिनेसृष्टीत अनेक वर्षे काम केल्यानंतर संजय रामगुडे यांना ही अनोखी संकल्पना सुचली. जगण्याच्या यातनेतून सुटल्यानंतर अनेकांना सरणापर्यंत पोहोचवण्याकरता चार खांदेही उपलब्ध होत नाहीत. विभक्त कुटुंब पद्धत, परदेशी स्थायिक झालेली मुलं यामुळे अनेकदा एखाद्याचा मृत्यू झाल्यास संबंधित मृतांवर योग्यरित्या अंत्यसंस्कारही होत नाहीत. अशा प्रकरणात अंत्यसंस्काराचं पॅकेज पुरवणारी कंपनी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात २०१४पासून कार्यरत आहे.

- Advertisement -

कस्टमाइज पॅकेज

  • मृताच्या पूर्वइच्छेनुसार अवयवदान प्रक्रिया
  • मृत प्रमाणापत्रासाठी सहाय्य
  • मृताच्या जाती-धर्मानुसार पारंपरिक, पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार
  • त्यांनीच ठरवलेल्या पुरोहिताकडून, त्यांना आवडणाऱ्या फुलांमध्ये सजवून अंत्यसंस्कार
  • अस्थी विसर्जनाचीही सोय

कोरोना काळात २६० लोकांवर अंत्यसंस्कार

कोरोना काळात खरंतर या संकल्पनेचा अनेकांनी स्वीकार केला. कोरोनाने मृत झालेल्यांजवळ जाण्याची परवानगी नव्हती. अशा काळातही अनेक अनुभव आल्याचं संजय रामगुडे यांनी सांगितलं. तसंच, या काळात त्यांनी तब्बल २६० लोकांवर अंत्यसंस्कार केले. मीच अग्नी दिला, मीच अस्थीविसर्जन केलं. मीच मडके फिरवले, असं संचालकांनी सांगितलं.

- Advertisement -

प्री प्लान पॅकेज उपलब्ध

सुखांत कंपनीकडून प्री-प्लान पॅकेजही उपलब्ध आहे. वयाची पन्नाशी झालेले लोक हे प्री-प्लान घेऊ शकतात. यामध्ये कंपनीकडून संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती घेतली जाते. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, अचिव्हमेंट्स याविषयी नोंद घेतली जाते. त्यानुसार, ते हयात असेपर्यंत त्यांच्या आयुष्यातील हे अमूल्य क्षण साजरे केले जातात. त्यांच्या आवडी-निवडी जपल्या जातात. त्यानंतर, संबंधित व्यक्ती मृत झाल्यास त्यांच्यावर अंत्यविधीही केले जातात. म्हणजेच, आयुष्यातील चांगल्या क्षणापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ‘सुखांत’कडून सेवा पुरवली जाते.

माणसासाठी गाडीची सोय केली जाते. पण गाडीतून कोणी शव घेऊन जात नाहीत. अशा अत्यंत कठीण समयी आम्ही मदतीचा हात देतो. म्हणजेच, जाता-जाता जीवनातील अंतिम क्षणाची चिंताच आम्ही मिटवतो.
– संजय रामगुडे, संचालक, सुखांत अंतिम संस्कार प्रायव्हेट लिमिटेड

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -