घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनवीन वर्षात होणार सुंदर नारायणाचे दर्शन; मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

नवीन वर्षात होणार सुंदर नारायणाचे दर्शन; मंदिराचे काम अंतिम टप्प्यात

Subscribe

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात विशिष्ट बांधकाम शैलीतील अनेक ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरे आहेत. यामध्ये श्री सुंदर नारायण मंदिराचाही प्रामुख्याने समावेश होतो. मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने केंद्र सरकारच्या साडेबारा कोटी रुपये निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. ४ वर्षापूर्वी सुंदर नारायण मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामाचा शुभारंभ झाला. दरम्यानच्या काळात अनेक अडचणी निर्माण झाल्याने मंदिराचे काम रखडत गेले. परंतु, डिसेंबर महिन्याच्या समाप्ती पर्यंत किंवा जानेवारी महिन्याच्या सुरवातीला मंदिराचे काम पूर्णत्वास आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या विभागीय अधिकारी आरती अळे यांनी केल्याने नवीन वर्षात सुंदर नारायणाचे दर्शन भाविकांना होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

पंचवटीतील गोदावरीच्या तीरावर श्री सुंदर नारायण मंदिर सन १७५६ च्या सुमारास बांधले गेले. सरदार गंगाधर यशवंत चंद्रचूड यांनी या विष्णूच्या अर्थात सुंदर नारायण मंदिराची बांधणी केली. त्या काळात सरदार चंद्रचूड यांना मंदिर बांधणीच्या कामासाठी जवळपास १० लाखांचा खर्च आला असल्याच्या नोंदी आढळतात. उत्तम बांधणी आणि विविध शिल्पकृतीमुळे हे मंदिर वेगळेपण टिकवून आहे. संपूर्ण काळ्या पाषाणात बांधलेल्या या मंदिरासाठी दगड, चुना, शिसव, नवसागर आदी साहित्याचा वापर करण्यात आलेला आहे. या मंदिराचाही अतिप्राचिन मंदिरांमध्ये प्रामुख्याने समावेश होतो. मात्र, कालौघात मंदिराची झीज झाल्याने मंदिराचा सर्व जुना पाषाण उतरवून त्याजागी नव्याने जुन्याच पद्धतीचा हुबेहूब पाषाण बसवण्याची मागणी पुढे आली. त्यासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात आली. केंद्रानेही तात्काळ १२ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला.

- Advertisement -

मात्र, निधी पुरेसा असतांना, कामाचा योग्य आराखडा असतांनाही मंदिर जीर्णोद्धारासाठी तब्बल ४ वर्षाहून अधिकचा कालावधी लागतो आहे. एक ते दीड वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित असताना इतका उशीर होण्यामागे अनेक कारण आहेत. ज्यात सुरवातीला मंदिराच्या बाजूला असलेली विद्युत डीपीचा अडथळा निर्माण झाला. डीपी हलवण्याच्या प्रक्रियेत बराच अवधी लागल्याने मंदिर जिर्णोद्धारसाठी गृहीत धरलेली एकूण वेळ त्यातच खर्ची पडली. त्यानंतर काहीसे कामाला सुरवात झाली तेवढ्यात कोरोनाच्या संकटामुळे मंदिराच्या कामाला खीळ बसली. त्यानंतर, अश्या पद्धतीचे काम करण्यासाठी विशिष्ट पद्धतीच्या कामगारांची आवश्यकता असल्याने त्यांची उपलब्धता ही मोठी समस्या निर्माण झाली. मंदिराचे जीर्णोद्धार ज्याकाळातील त्याची बनावट आहे त्याच पद्धतीने होत असल्याने त्यात चुन्याचा वापर केला जातो. त्यामुळे पावसाळयाच्या दिवसात कामाचा वेग अगदीच मंदावतो. अश्या अनेक कारणांनी मंदिराचे काम चार वर्षाहून अधिक काळ रेंगळले. मात्र, पुरातत्व विभागाच्या विभागीय अधिकारी आरती अळे यांनी काम डिसेंबर पूर्वाधात काम पूर्ण होण्याचा विश्वास व्यक्त केल्याने नवीन वर्षात नक्कीच सुंदर नारायणाचे दर्शन घेता येईल अशी आशा निर्माण झाली आहे.

 यंदाही कार्तिकीचा हरिहर सोहळा खंडित

कार्तिकी एकादशीला कपालेश्वर मंदिर आणि सुंदर नारायण मदिराच्या दरम्यान अनोखा हरीहर उत्सव साजरा केला जातो. शेकडो वर्षाची परंपरा सुंदर नारायण मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामामुळे मागील ४ वर्षापासून खंडित झाली आहे. भाविकांना यंदा तरी उत्सव साजरा होईल अशी आशा होती परंतु तसे झालेले नाही. हरिहार सोहळ्यात कार्तिकी एकादशीच्या दिवशी कपालेश्वर मंदिरातून बेलाचा हार सुंदरनारायण मंदिरातील विष्णू भगवान यांना अर्पण केला जातो तर विष्णू भगवान यांचा तुळशी हार कपालेश्वरच्या महादेवाला अर्पण केला जातो.

का झाला कामाला विलंब?

  • मंदिराच्या बाजूला असलेल्या विद्युत डीपीचा अडथळा
  • डीपी हलवण्यासाठी निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणी
  • कायदेशीर अडचणी दूर झाल्यानंतर लालफितीच्या कारभारात अडकली डीपी
  • २५० वर्षापूर्वीच्या स्थापत्य शास्त्रानुसार कामासाठी विशिष्ट कामगारांचा शोध
  • विशिष्ट कामगार नगण्य संख्येत असल्याने त्यासाठी लागलेला वेळ
  • वैशिष्टपूर्ण कामगार असल्याने कामगारांची संख्या वाढवणे अशक्य
  • २ वर्ष कोरोनाच्या काळात काम पूर्णत ठप्प 
  • कामासाठी चुन्याचा वापर होत असल्याने पावसात काम थांबवावे लागते
  • पावसाळ्यात कामाचा वेग मंदावतो
  • कलाकुसरीचे काम वेळखाऊ
  • वैशिष्टपूर्ण पाषानाची उपलब्धताही समस्या
  • रहदारी व रहिवासी परिसर असल्याने कामासाठी वेळ व जागेचे बंधन 

मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम ७५ टक्क्याहुन अधिक पूर्ण झाले आहे. डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत काम पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. असे म्हंटले आहे. एकूणच पावसाळया नंतर कामणे पकडलेली गती लक्षात घेता आम्ही काम नक्कीच लवकर पूर्ण करू : आरती अळे, विभागीय अधिकारी, पुरातत्व विभाग

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -