मुंबई : मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या या घोषणेनंतर राज्यात खळबळ माजली आहे. परिणामी महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गट बाहेर पडणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, संजय राऊतांच्या या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी वक्तव्य केले आहे. (Sunil Tatkare On Sanjay Raut Election Statement NCP vvp96)
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
एका वृत्तवाहिनीसी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी संजय राऊतांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, “संजय राऊत, शिवसेना महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने कशी निवडणूक लढवायची हा त्यांचा प्रश्न आहे. पण भिन्न विचारसरणीचे लोक जेव्हा महायुती, मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा त्यांचा एकत्रितपणा किती क्षणासाठी आहे, हे यातून दिसून येतं”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
संजय राऊत काय म्हणाले?
“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – Jitendra Awhad : मविआत फूट? राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आव्हाडही म्हणाले – त्यांना थांबवणारे आम्ही कोण?