मुंबईतील कोस्टल रोडअंतर्गत उद्यानांसह पार्किंग उभारण्यास ‘सर्वोच्च मंजुरी’

Supreme Court decision Corona vaccine cannot be enforced to people

मुंबईतील विशेषतः पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल १२ हजार कोटींपेक्षाही जास्त रक्कम खर्चून देशातील पहिलाच ‘कोस्टल रोड’ उभारत आहे. या कोस्टल रोडच्या अंतर्गत समुद्रात भराव टाकून विविध सेवासुविधा उभारण्याच्या कामांना विरोध दर्शविणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता कोस्टल रोडअंतर्गत उद्याने, खेळांची मैदाने, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, प्रसाधनगृह, भूमिगत पार्किंग व फुलपाखरू उद्यान आदी विविध विकासकामे उभारण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
त्यामुळे आता ‘कोस्टल रोड’ ची कामे विना अडथळा सुसाट होणार आहेत.

या निकालाबाबत मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच, या निर्णयामुळे मुंबई कोस्टल रोड हा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल व अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनानुसार, ‘कोस्टल रोड’ या प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे, अशी माहिती प्रमुख अभियंता (प्रभारी) मंतय्या स्वामी यांनी दिली.

तसेच, या प्रकल्पासाठी आवश्यक त्या विविध परवानग्या यापूर्वीच घेण्यात आल्या आहेत. तथापि, या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयात विविध संस्थांद्वारे सदर कामाला विरोध दर्शवणार्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. कोस्टल रोडच्या कामांसाठी प्राप्त झालेल्या विविध परवानग्या या केवळ रस्त्यासाठी असून इतर नागरी सेवा सुविधांसाठी नाहीत, असा मुद्दा या याचिकांमध्ये नमूद करण्यात आला होता. याबाबत यापूर्वीच्या निकालाच्या अनुषंगाने महापालिकेद्वारे मा. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या संदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाद्वारे मुंबई महापालिकेच्या बाजूने निकाल देण्यात आल्याने आता कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत विविध लोकोपयोगी सुविधा उभारण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

कोस्टल रोडसाठी उपलब्ध होणा-या भराव क्षेत्रापैकी २५ ते ३० टक्के क्षेत्रात कोस्टल रोडचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित सुमारे ७० ते ७५ टक्के क्षेत्रात म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फूट परिसराचा उपयोग हा लॅडस्केपिंगसह विविध नागरी सुविधांसाठी करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रसाधन गृह, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, फुलपाखरु उद्यान, सागरी पदपथ, खुले नाट्यगृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमीगत पदपथ, जेट्टी इत्यादींचा समावेश असणार आहे. याव्यतिरिक्त १ हजार ८५६ एवढी वाहन क्षमता असलेल्या ३ भूमीगत वाहनतळांचाही यात समावेश असणार आहे. यात ‘लॅण्डस्केपिंग’ प्रत्यक्ष स्वरुपात आकारास येण्यापूर्वी ते अधिकाधिक सुविधापूर्ण करण्याच्या दृष्टीने नागरिकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत, अशी प्रमुख अभियंता श्री. स्वामी यांनी दिली आहे.

कोस्टल रोड प्रकल्पासाठी १ कोटी ३ लाख ८३ हजार ८२० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात म्हणजेच २८ लाख ५२ हजार २९५ चौरस फुटांमध्ये कोस्टल रोडचे बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ७५ लाख ३१ हजार ५२५ चौरस फुटांमध्ये नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. मुंबईत कोस्टल रोडलगतच्या धार्मिक स्थळांना व पर्यटन स्थळांना नागरिक मोठ्या संख्येने भेट देत असतात. हे लक्षात घेऊन, या स्थळांच्या जवळच्या परिसरात ३ मोठी भूमीगत वाहनतळे उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यापैकी एक वाहनतळ हे महालक्ष्मी मंदिर व हाजीअली दर्गा यांच्या जवळ असणार आहे. दुसरे वाहनतळ हे ‘अमर सन्स गार्डन’ जवळ असणार आहे.

तर मोठ्या प्रमाणात शालेय सहली येणा-या वरळी डेअरी व वरळी सी-फेस येथे तिसरे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. या तिन्ही वाहनतळांची एकूण वाहनक्षमता ही १ हजार ८५६ एवढी असणार आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही वाहनतळ भूमीगत असणार असून त्यांच्या छतावरती उद्यान वा खेळाचे मैदान विकसित करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. तसेच, ‘फुलपाखरु उद्यान’, जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक व सागरी पदपथ, उद्याने आणि खेळांची मैदानेही उभारण्यात येणार आहेत.


हेही वाचा : शिंदे गटाकडून गर्दी जमवण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या आवाजाचा वापर, दसरा मेळाव्याच्या टीझरवरून हल्लाबोल