मुंबई : प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या 1200 वरून 1500 पर्यंत का वाढवली? अशी विचारणा करीत सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या वाढवण्याला आक्षेप घेणारी एक जनहित यााचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. (supreme court seeks clarification from election commission on increasing number of voters at polling booth)
या याचिकेवर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती पी. व्ही. संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान खंडपीठाने निवडणूक आयोगाकडून ३ आठवड्यांमध्ये उत्तर मागितले आहे. या याचिकेवरील पुढील सुनावणी जानेवारी 2025 मध्ये होईल.
ऑगस्ट 2024 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारसंख्या वाढवल्याची माहिती जारी केली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका इंदू प्रकाश सिंग नावाच्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. कुठलीही आकडेवारी वा आधाराशिवाय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेला अधिक वेळ लागेल. मतदानाला विलंब झाल्यास मतदारांची गर्दी वाढेल. मतदार मतदान करण्यास टाळतील. उपेक्षित समुदाय आणि कमी उत्पन्न गटातील विशेषत: रोजंदारी करणारे फार काळ थांबू शकत नाहीत. कारण त्यांना दिवसाची मजुरी सोडून द्यावी लागते, असा आक्षेप या याचिकेतून घेण्यात आला आहे. भविष्यात प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या वेळोवेळी कमी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
एका मतदानासाठी 60-90 सेकंद
प्रत्येक मतदाराला मतदानासाठी अंदाजे 60-90 सेकंद लागतात. मतदान साधारणपणे 11 तास चालते, याचा अर्थ प्रत्येक मतदान केंद्रावर फक्त 495-660 लोकच मतदान करू शकतात. 65.7 टक्क्यांच्या सरासरीने 1000 मतदारांसाठी बनवलेल्या मतदान केंद्रात अंदाजे 650 मतदार मतदान करू शकतात. ही संख्या वाढल्यास मतदानाची वेळ संपूनही मतदारांना रांगेत उभे राहावे लागेल किंवा मतदान न करताच घरी निघून जावे लागेल. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने एका मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या ग्रामीण भागात 1200 आणि शहरी भागात 1400 इतकी मर्यादित ठेवण्याचे निर्देश दिले होते. (supreme court seeks clarification from election commission on increasing number of voters at polling booth)