सुप्रीम कोर्टाने ‘हे’ प्रकरण अधिक गांभीर्याने घ्यायला हवे, ठाकरे गटाने व्यक्त केली चिंता

Rahul Narvekar will issue notice to 54 MLAs of Thackeray group and Shiv Sena
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra political crisis) सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांना दोषी मानले, पण त्यांना सुळावर चढविण्याचे काम विधानसभा अध्यक्षांचे आहे. पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Assembly Speaker Rahul Narwekar) सांगतात व सांगत होते, ‘‘अपात्र आमदारांचे प्रकरण शेवटी माझ्याकडेच येणार!’’ ही धमकी समजायची काय? तसे काही असेल तर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हे प्रकरण अधिक गांभीर्याने घ्यायला हवे, अशी चिंता ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.

न्यायमूर्ती निर्घृण गुन्हेगारास फाशीची शिक्षा ठोठावतात, पण त्याला प्रत्यक्ष फाशी देण्याचे काम स्वतंत्र यंत्रणेचे असते. सर्वोच्च न्यायालयाने तेच केले आहे, पण महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोठे आहेत? ते पडद्यामागे कोणत्या हालचाली करीत आहेत? न्यायालयाने गुन्हेगार ठरवलेल्या आमदारांवर ते कायद्याने कारवाई करणार की घटनापीठावर बसलेली ही व्यक्ती पुन्हा राजकीय स्वार्थासाठी दोषी आमदारांचा बचाव करणार? महाराष्ट्राच्या मातीला कलंक लावणार की, या मातीचे तेज दाखवणार? याच मातीत घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जन्मास आले. त्याच मातीशी इमान राखणार की दिल्लीच्या ‘शाह्यां’’पुढे झुकून घटना, कायद्याचा मुडदा पाडणार? अशा प्रश्नांची सरबत्ती ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – पंतप्रधान मोदी यांनी शिंदे-फडणवीस यांना घरी पाठवायला हवे, ठाकरे गटाचे आवाहन

बारा गावचे पाणी प्यायलेले विधानसभा अध्यक्ष
विधानसभेच्या अध्यक्षांचा राजकीय पर्यटनाचा इतिहास पाहता ते दिल्लीतील शाह्यांचेच गुलामी पत्करताना दिसत आहेत. मीडियासमोर येऊन दोषी आमदारांवर रंगसफेदी करणाऱ्या मुलाखती देताना दिसत आहेत. विधानसभा अध्यक्षांचा राजकीय प्रवास मोठा आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप अशा प्रवासात ते बारा गावचे पाणी प्यायले आहेत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी आवाज उठवायला हवा
विधानसभा अध्यक्ष सतत मुलाखती देतात. त्यांच्यासमोर जे प्रकरण निष्पक्ष न्यायासाठी आले आहे त्यावर बोलतात, हे नियमबाह्य आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांच्या वर्तनावर आवाज उठवायला हवा. विधानसभा अध्यक्ष या सर्व प्रकरणात वेळकाढूपणा करतील व प्रकरण शेवटी थंड्या बस्त्यात ढकलले जाईल, ही लोकांच्या मनात भीती आहे, मात्र विधानसभा अध्यक्षदेखील घटनेवर श्रद्धा ठेवून सबुरीने हे प्रकरण हाताळतील अशी वेडी आशा बाळगायला काय हरकत आहे? असा खोचक टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

विधानसभा अध्यक्षांना खऱ्या-खोट्याची जाण
विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष पूर्वी प्रदीर्घ काळ शिवसेनेतच होते. शिवसेनेतूनच त्यांची कारकीर्द बहरली. त्यांना खरी व खोटी शिवसेना माहिती आहे. ते सर्वोच्च न्यायालयात अनेकदा शिवसेनेचे वकील होते. त्यामुळे खऱ्या-खोट्यांची जाण त्यांना असायला हवी. सर्व विरोधी पक्षांनी एक होऊन राज्यातील घटनाबाह्य सरकारची कोंडी करावी व त्यांना सत्तेवरून लाथा घालून हाकलून द्यावे, असे हे प्रकरण आहे, असे या अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – ‘चोर आणि लफंगे’ हीच भाजपाच्या सत्तेची गुरुकिल्ली, ठाकरे गटाचा घणाघात