Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाचा निर्णय संभ्रमात टाकणारा – राज ठाकरे

न्यायालयाकडून देण्यात आलेला निकाल हा संभ्रमात टाकणारा आहे, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. एकंदरित सर्वसामान्यांच्या मनातील भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकच आमदार असला तरी त्यांना राज्याच्या राजकारणात मोठे महत्त्व आहे. ते त्यांच्या बिनधास्त बोलण्यामुळे कायमच चर्चेचा विषय असतात. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वच राजकीय नेत्यांनी भाष्य करत आपले मत व्यक्त केले आहे. पण राज ठाकरे यांनी या निकालाबाबत कोणतेही मत व्यक्त केलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. सध्या राज ठाकरे मीरा-भाईंदरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तर न्यायालयाकडून देण्यात आलेला निकाल हा संभ्रमात टाकणारा आहे, (Supreme Court’s decision will create confusion) असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एकंदरित सर्वसामान्यांच्या मनातील भावना राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला निर्णय हा संभ्रमात टाकणारा आहे. माझ्यावर जेव्हा कोणते खटले दाखल होतात. त्यावेळी कोर्टाकडून किंवा पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात येतात. त्यावेळी त्यातील भाषा वाचून कळत नाही की त्यांना आपल्याला सोडलेले आहे की अटक केली आहे. ती इतकी किचकट भाषा असते. कोर्टाने सांगितले की संपूर्ण प्रक्रिया चूकली पण त्यावेळी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. विधिमंडळातील गट हा पक्ष म्हणून समजला जाणार नाही. मग निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याचं काय होणार? कोर्टाचा निर्णय गोंधळात टाकणारा आहे. भयंकर संभ्रम निर्माण करणारा निर्णय आहे, असे राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

त्यांचे प्रश्न विचारून वेळ वाया घालवू नका…
उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या आधारेने राजीनामा दिल्याचे म्हटलं आहे, असे राज ठाकरे यांना विचारले असता, उद्धव ठाकरेंचे काय प्रश्न आहे त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मला त्यांचे प्रश्न विचारू नका. तो वेगळा पक्ष आहे. माझा वेगळा पक्ष आहे. त्यांचे प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवू नका, असे म्हणत राज ठाकरे पत्रकारावर संतापले.

कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलंच पाहिजे..
मुख्यमंत्र्यांनी जपून राहिलं पाहिजे असे तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला होता. आताही मुख्यमंत्र्यांना तोच सल्ला देणार का? असा प्रश्न देखील यावेळी राज ठाकरे यांना पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्याबाबत ते उत्तर देत म्हणाले की, कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी जपूनच राहिले पाहिजे. आधीचे नाही राहिले त्यामुळे हे सर्व घडल आहे, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला.

राज ठाकरे हे सध्या मीरा-भाईंदरच्या दौऱ्यावर आहेत. याबाबत त्यांच्याकडून माहिती देण्यात आली. विधानसभा आणि लोकसभेचा अंदाज घेण्यासाठी मी दौऱ्यावर आलो आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी बोलून परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्यामुळे आधी महाराष्ट्र सैनिकांशी बोलू द्या, त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेऊ द्या, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.