कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार केव्हा रिटायर्ड होणार याची अनेक लोक वाट पाहून आहेत. पण ते कधी रिटायर्ड होतील हे मला माहित नाही, असे म्हणत शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना टोला लगावला. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकरांना उद्देशून खासदार सुळे म्हणाल्या की, तुमचा पक्षाचे नेते वेळ देत नाही, असे सांगून तुमच्या पक्षात फूट पडली. आमच्या पक्षात नेते जास्त वेळ देतात म्हणून पक्षातून फुटून बाहेर गेले, असे म्हणत खासदार सुळेंनी राष्ट्रावादी काँग्रेस (अजित पवार) नेत्यांवर निशाणा साधला.
‘प्रेमानं मागा सगळं देऊन टाकू, खाली हाथ आये थे खाली हात जायेंगे’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. निवडणुका येतात आणि जातात पण नाती कायम राहतात, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. मी कोणत्याही पदासाठी महत्वकांक्षी नाही. पण हे अनेकांना पटत नाही असेही खासदार सुळे म्हणाल्या. त्या कोल्हापुरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.
माझ्या निवडणुकीत हे लक्षात आलं की कोणी आपल्या सोबत नसलं तरी चालेल पण जनता आपल्या सोबत असायला हवी, तुम्हाला कुणीही हरवू शकत नाही, असे खासदार सुळे म्हणाल्या. सगळी यंत्रणा माझ्या विरोधात होती. आमदार, खासदार, सरपंच सुद्धा माझ्यासोबत नव्हते. तरी जनतेनं मला निवडून आणलं, असे खासदार सुळे म्हणाल्या.
शरद पवार केव्हा निवृत्त होणार?
माझ्या वडिलांचे कोल्हापूरवर मोठं प्रेम असल्याचे खासदार सुळे म्हणाल्या. आमचे वडील कधी रिटायर्ड होतील असं अनेकांना वाटतं. पण ते कधी रिटायर्ड होतील हे मला माहित नाही. प्रकाश आबिटकर साहेब तुमचा पक्ष फुटला कारण नेते वेळ देत नाहीत म्हणून, आणि आमचा पक्ष फुटला नेते जास्त वेळ देतात म्हणून, असा टोलाही खासदार सुळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला टोला लगावला. खात्यातील फाईलींबद्दल बोलायला अभ्यास लागत नाही, इतिहासावर बोलायला जास्त अभ्यास करावा लागतो. मला आता ऐकायला शिकवलं आहे. बोलण्यापेक्षा ऐकण्यात खूप शक्ती लागते असे खासदार सुळे म्हणाल्या. म्हणूनच मी लोकसभेला जिंकली आहे. आरे ला का रे, केलं असतं तर निवडून आले नसते असेही सुळे म्हणाल्या.
महाराष्ट्र सरकारने ताराराणी यांचे धडे पुस्तकात आणले पाहिजेत असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. केवळ पुतळे बांधून आणि मालिका तयार करून चालणार नाही असंही त्या म्हणाल्या. हा देश संविधानाने चालतो, कुणाच्या मर्जीने चालत नाही. कितीही लढू पण हा देश संविधानाने चालवू असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर देखील सुळेंनी प्रतिक्रिया दिली. गुन्हा करणारा जितका दोषी असतो तसा गुन्हा सहन करणारा देखील दोषी असतो. बीड प्रकरणात आपण गप्प बसलो तर चालणार नाही असेही सुळे यावेळी म्हणाल्या.
हेही वाचा : Supriya Sule: मी सरकारमध्ये असते तर कधीच राजीनामा दिला असता; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या