कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संसदेबाहेर सुप्रिया सुळेंसह शिवसेनेच्या खासदारांची घोषणाबाजी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. जवळपास २३ दिवसांचे हे हिवाळी अधिवेशन असणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावद संसदेत पोहोचला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेच्या खासदारांनी हा मुद्दा संसदेत मांडला. तसेच कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संसदेबाहेर सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेनेच्या खासदारांनी घोषणाबाजीही केली.

सुप्रिया सुळे यांनी घोषणाबाजी केल्यासंदर्भात ट्वीटही केलं आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संसद भवनाच्या परिसरातील पुतळ्यासमोर उभे राहून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या खासदारांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. बीदर,भालकी,बेळगाव,कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणाही दिल्या. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनिल तटकरे, डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.

सुप्रिया सुळे नेहमीच महाराष्ट्रातील मुद्द्यांवर संसदेत हल्लाबोल करत असतात. त्यांची आक्रमक शैली संसदेसाठी नवीन नाही. गेल्या दहा दिवसांपासून महाराष्ट्रात सीमावाद तापला आहे. त्यातच, काल मंगळवारी सीमेवर महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे हा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी घेतला जाईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. त्यानुसार, सुप्रिया सुळे यांनी आज पहिल्याच दिवशी सीमावादाचा प्रश्न संसदेत मांडला.

‘महाराष्ट्रात गेल्या १० दिवसांपासून नवा प्रश्न उभा राहिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात काहीही बरळत आहेत. काल कर्नाटकच्या सीमेवर महाराष्ट्राच्या लोकांवर हल्ला करण्यात आला आहे. १० दिवसांपासून महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचलं जात आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राविरोधात बोलतात. हा देश एक आहे. मी अमित शाहांना विनंती करते की त्यांनी काही बोलावं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.


हेही वाचा : लोकसभेत सीमावादावरून खडाजंगी; सुप्रिया सुळे आक्रमक, कर्नाटककडूनही प्रतिवाद