महिलेला मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानंतर सुप्रिया सुळे आणि यशोमती ठाकूर यांची सरकारवर टीका

शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार झाला. यामध्ये एकूण 18 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 9 तर शिंदे गटाच्या 9 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, या मंत्रीमंडळ विस्तारात एकाही महिलेला संधी देण्यात आली नाही. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसच्या नेत्या, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

आमच्याकडून गेलेल्या अनेक लोकांना या मंत्रिमंडळात जागी मिळाली आहे. त्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. या मंत्रिमंडळात आमच्या बरोबरचे आणि विचारांचे काम करणारे अनेक चेहरे दिसताहेत. त्यामुळे मला खूप आनंद आणि समाधान वाटलं. 18 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. यामध्ये एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न मिळणं हे खूप दुर्दैव आहे. या देशातील महिलांची लोकसंख्या 50 टक्के इतकी आहे. त्यामुळे 18पैकी एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न देणं हे खेदजनक आणि आश्चर्य वाटण्यासारखं आहे.

स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रिमंडळ शपथविधीत महिलांना प्रतिनिधित्व देण्यात आलं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे एक जोक – यशोमती ठाकूर

सुप्रिया सुळे यांच्यानंतर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महिलेला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याबाबत टीका केली आहे. मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही. हा मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे एक जोक आहे, अशी खिल्ली यशोमती ठाकूर यांनी उडवली आहे.

दरम्यान, आज 39 दिवसानंतर शिंदे सरकारच्या 18 लोकांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची आठवण भाजपला करुन दिली आहे.


हेही वाचा : प्रवाह विरुद्ध राजकारण करणाऱ्या दादा भुसेंनी घेतली मंत्रीपदची शपथ