हिंगणघाट जळीतकांड प्रकरण : पीडितेचा मृत्यू नाही तर हत्या – सुप्रिया सुळे

हिंगणघाट पीडितीचा हा मृत्यू नसून ही तिची हत्या करण्यात आली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

हिंगणघाट जळीतकांडातील मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेची अखेर झुंज अपयशी ठरली आहे. आज, सोमवारी सकाळी ६.५५ मिनिटांनी तिचा मृत्यू झाल्याची माहिती तिच्यावर उपचार करणार्‍या ऑरेंज सिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेली पीडितीची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. तिच्या या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रानी हळहळ व्यक्त केली आहे. तर राजकीय नेत्यांकडून याबाबत संताप देखील व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील संताप व्यक्त करत पीडितेचा हा मृत्यू नसून हत्या आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही घटना आहे. कारण हा मृत्यू नाही तर हत्या आहे, असे मला वाटते. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचा गृहमंत्र्यांनी केलेला उल्लेख कृतीत येण्याची अत्यंत तातडीची गरज आहे,’ अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. ‘कुठलीही व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीला तात्काळ न्याय हा मिळाला पाहिजे. कारण कायद्याचा धाक बसणे अतिशय गरजेचे आहे. तिच्या आईवडिलांच्या भावनांचा विचारही करु शकत नाही. ते कोणत्या भयानक परिस्थितीतून जात असतील. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला गेला आहे. आधार म्हणून त्यांच्यासोबत उभे राहणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

काय घडल होत

वर्ध्यातल्या हिंगणघाट येथे एका महाविद्यालयात अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरूणीला आरोपी विकेश नगराळे यांने पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरुणी सोमवारी सकाळी घरून हिंगणघाटला आली होती. तिच्या मार्गावर दबा धरून बसलेल्या आरोपी विकेश नगराळे याने तिला गाडीतील पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. तरूणीने आरडाओरड केल्यानंतर आग विझवून तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते.


हेही वाचा – हिंगणघाट पीडितेची झुंज अपयशी; प्राध्यापिकेचा मृत्यू