महिला सुरक्षा मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंची शिंदे-फडणवीसांकडे धाव; म्हणाल्या, शिवरायांच्या महाराष्ट्रात…

मुंबई – हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे. अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे, याची आठवणही खासदार सुप्रिया सुळे यांनी करून दिली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो असेही खासदार सुप्रियाताई सुळे म्हणाल्या आहेत.

महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणारी व्यक्ती कुणी सर्वसामान्य नसून महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरा असणाऱ्या विधिमंडळातील सदस्य असेल तर राज्याचे पालक म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालणे अधिक गरजेचे आहे. संबंधित लोकप्रतिनिधी हे सरकार पक्षाचे आहेत म्हणून सरकार त्यांना पाठीशी घालत आहे का? असा सवाल करतानाच त्यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही हे अतिशय खेदजनक आहे, असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.


आक्षेपार्ह वक्तव्ये, विनयभंंग अथवा सायबर क्राईम असो महिलांच्या संबंधातील तक्रारींवर तातडीने कारवाई करणे अतिशय गरजेचे आहे. अन्यथा हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील असल्याचा संदेश जाईल. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.