बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय भेटल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून मी पदर पुढे करणार आहे. माझ्या भावाला न्याय द्यावा, अशी मागणी करणार आहे. तुम्ही-आम्ही सगळे ताकदीने लढू, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सुप्रिया सुळे यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार संदीप क्षीरसागर हे उपस्थित होते. भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मला मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा होत्या, पण…
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले. पण, एका कुटुंबाला 69 दिवस झाले न्याय मिळत नाही. हे धक्कादायक आहे. महाराष्ट्र माणुसकी विसरला आहे का? हा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत आमचे टोकाचे राजकीय मतभेद आहेत. पण, मला मुख्यमंत्र्यांकडून खूप अपेक्षा होत्या. देशमुख कुटुंब मुख्यमंत्र्यांना बोलल्यानंतर आठ दिवसांत न्याय मिळेल, असे वाटत होते. मात्र, हे राज्य मी चालवतो, राज्यात कुठलीही कृती सहन करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होते.”
सत्ता आणि पैशांची बीडमधील काही जणांना मस्ती आहे
“मी मुख्यमंत्र्यांना भेटून माझा पदर पुढे करून संतोष देशमुख यांना न्याय देण्याची मागणी करणार आहे. आठ दिवसांपूर्वी बजरंग बप्पा सोनवणे आणि मी गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले. जातीने लक्ष घालणार, असा शब्द अमित शहा यांनी आम्हाला दिला आहे. पोलीस किंवा कुणीही गुन्हेगार असुद्या, त्यांची गय करू नये. सत्ता आणि पैशांची बीडमधील काही जणांना मस्ती आहे. ती मस्ती उतरली पाहिजे. आपण हा लढा ताकदीने लढू,” असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
बीडमधील गुंडागर्दी थांबलीच पाहिजे
“बीडमधील गुंडागर्दी थांबलीच पाहिजे. महिलेने मनमोकळपणाने फिरलेच पाहिजे. विकास-विकास काय आहे, हा आहे का सरकारचा विकास?” असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.
कृष्णा आंधळे कुठे आहे?
“आम्हाला एक दिवसाआड अपडेट पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. वाल्मिक कराडची हिंमतच कशी होते? व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतो, हे सांगितले. कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे? ही पैसा आणि सत्तेची मस्ती आहे. लाज वाटली पाहिजे, सगळ्या लोकांना. हे महाराष्ट्र सहन करणार नाही. कृष्णा आंधळे कुठे आहे? तो गेला कुठे? सरकार रोज आमचे फोन ट्रॅप करतोय, मग कृष्णा आंधळे सापडत नाही,” असा प्रश्न सुळे यांनी सरकारला विचारला आहे.
वाल्मिक कराडच्या मागे ईडी आणि सीबीआय का लागली नाही?
“खंडणी मागणे गुन्हा आहे. वाल्मिक कराडला खंडणी मागत होता, तर आधी अटक का झाली नाही? वाल्मिक कराडच्या मागे ईडी आणि सीबीआय का लागली नाही? मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता, तर जून महिन्यापासून सरकार काय करत होते?” असा सवाल सुळे यांनी विचारला आहे.