आज (ता. ११ मार्च) पहाटेच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी ईडीचे अधिकारी हे छापेमारी करण्यासाठी दाखल झाले. पहाटेच ईडीकडून मुश्रीफांच्या घरी हजेरी लावण्यात आल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यामुळे काहीवेळासाठी या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या या कारवाईवर विरोधी पक्षातील नेते मंडळीकडून मत व्यक्त करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “हसन मुश्रीफ यांच्यावर दोन महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई झाली याचे काही आश्चर्य वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या प्रकरणात ईडी आणि सीबीआयने १०९ वेळा छापेमारी केली होती. हसन मुश्रीफ यांच्यावर छापेमारी करून ईडी आणि सीबीआयला हा विक्रम मोडायचा असावा ही शक्यता नाकारता येत नाही. हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडी तिसऱ्यांदा गेली आहे तरीही पहिल्या दोन कारवायांमध्ये काय झाले? त्याची माहिती मिळत नाही हे दुर्दैव आहे.”
“विरोधकांच्या विरोधात केंद्र सरकारने सातत्याने यंत्रणा राबवण्यास सुरूवात केली आहे. संविधानाच्या बाहेरच्या चौकटीत जाऊन हे सगळं सुरु आहे. हा प्रवास दडपशाहीच्या दिशेने सुरू आहे का? अशी शंका आता येऊ लागली आहे. आता ही शंका शंकेपुरतीच मर्यादित न राहता त्याच दिशेने केंद्र सरकार पाऊले उचलत आहेत हे दिसून येतं आहे. अनिल देशमुख, संजय राऊत, एकनाथ खडसे, नवाब मलिक यांच्यावरही याच पद्धतीने अन्याय झाला आहे. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात झालेली ही कारवाई आता आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्षात आणून देऊ,” असे सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “भाजपा हे सगळं जाणीवपूर्वक करत आहे. त्यांचा विरोधकांना घाबरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण अनिल देशमुखांचं प्रकरण नुकतंच पाहिलं आहे. परमवीर सिंहांनी जे काही आरोप केले त्याची काही चौकशी झाली नाही.” असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा – राज्याचे गृहमंत्री फडणवीस सांगतात, “मुश्रीफांच्या घरी छापा पडला हे माहिती नाही”
सरसेनापती संताजी घोरपडे आणि आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्या प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याची सांगण्यात आले आहे. या कारखान्यांमध्ये हसन मुश्रीफ यांनी करोडो रूपयांचा घोटाळा केला असल्याचे बोलले जात आहे. गेल्या ९ तासांपासून ईडीचे अधिकारी हे मुश्रीफांच्या घरात तपास करत आहेत.