मुंबई : सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाचे प्रमुख नेते हे विविध माध्यमांना मुलाखती देत आहेत. अशामध्ये सोशल मिडीयावर दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देव आणि श्रद्धा याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी नवरात्रीचे उपवास ते पांडुरंगावर असलेली आस्था याबद्दल त्यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी नवरात्रीचे उपवास का करत नाही? याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. (Supriya Sule on belief in god express her emotions from pandharpur to navratri fasting)
का नवरात्रीचे उपवास करत नाही?
“माझी आई आणि माझ्या सासू या श्रद्धाळू आहेत. माझ्या आजी शारदा पवार या नवरात्रीनिमित्त 9 दिवसाचे उपवास करायच्या. त्यानंतर माझ्या आईने हे उपवास करण्यास सुरुवात केली. मी अनेकदा आईला म्हणते की, मी आता हे उपवास करते. पण आई म्हणाली की, करायला काहीच हरकत नाही. पण तुमच्यासारखी लोकं सतत घराच्या बाहेर असतात. तुमची कामे अखंड सुरू असतात. उपवासाच्या दिवशी तुमच्या योजना आखण्यासाठी त्रास होणार, तर जिथे तुम्ही जाणार तिथल्या लोकांनाही त्रास होणार, तुम्ही बाहेर राजकारणी आहात, त्यामुळे तुम्ही करू नका. तुला मनापासून जे करायचे आहे ते कर. त्यामुळे 365 दिवस मी उपवास करत नाही,” असे स्पष्टीकरण सुप्रिया सुळे दिले.
माझी पांडूरंगांवर श्रद्धा : सुप्रिया सुळे
पंढरपूर आणि पांडुरंगावरील श्रद्धेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “कशावरच अंधश्रद्धा नाही, पांडुरंगावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. जेव्हा मला पांडुरंगाला भेटण्याची इच्छा होते तेव्हा मी जाते. हे माझे भाबडे प्रेम आणि श्रद्धा आहे. ही माझी श्रद्धा मी कोणावरच लादत नाही. इच्छा नसेल तर मी कोणतीही गोष्ट कोणावरही लादत नाही. माझ्या आई वडिलांनीही कधी माझी श्रद्धा ठरवली नाही. माझे आणि पांडुरंगाचे नाते कसे जमले हे आमच्या दोघांमध्येच आहे.” तसेच पुढे त्यांनी अधिक महिन्यातील जावयाच्या पाय धुण्याच्या प्रथेवरही भाष्य केलं. “मी एका रीलमध्ये जावयाचे पाय धूत असल्याचे बघितले. दर अधिक महिन्यात जावयाला घरी बोलवायचे आणि त्याला गिफ्ट देऊन त्याला ओवाळायचे. मी ठरवले की असली जेवणे बारामती लोकसभा मतदारसंघात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्रात होऊ देणार नाही. त्यापेक्षा लग्न झाल्यानंतर अधिक महिना येईल, तेव्हा जोडप्याने आपल्या आई-बाबा आणि सासू-सासऱ्यांना बोलवावे आणि त्यांचे पाय धुवावे. त्यांना जेवू घालावे आणि त्यांना गिफ्ट द्यावे. हे चित्र आपण बदलायला हवे.”