नवी दिल्ली – महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होऊन आज 72 तासानंतर अर्थात तीन दिवस होत आहेत. महायुतीला विक्रमी बहुमत मिळाल्यानंतरही सरकार स्थापन करण्याचा मुहूर्त ठरत नाही. यात अडचणीचं ठरत आहे ते मुख्यमंत्री पदावर कोण असणार हा या प्रश्नाचं उत्तर. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही सरकार स्थापनेला उशिर होत असल्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंचं कौतूक करत महायुतीला टोला लगावला आहे. सोमवारपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे, त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या दिल्लीत आहे. महाराष्ट्राच्या निकालावर आणि सरकार स्थापन होण्यास होत असलेल्या उशिरावर त्यांनी महायुतीला टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरे 2019 साली तेव्हा हेच सांगत होते…
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यात एवढं मोठं बहुमत आहे, तरीही वेळ लागतोय हे आश्चर्यकारक आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाही यात काही आश्चर्य वाटत नाही. भाजपने एकनाथ शिंदे यांना शब्द दिलं होता की नाही हे त्यांनाच माहीत. पण, 2019 साली देखील उद्धव ठाकरे यांच्याबाबत असंच झालं होतं. उद्धव ठाकरे 2019 साली तेव्हा हेच सांगत होते, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपवर निशाणा साधला. त्यासोबतच खासदार सुळे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली, त्याचाच हा करिश्मा होता. शिंदे यांना फसवल की नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे, शिंदे यांचा चेहरा होता. त्यामुळे हे यश मिळालं, हे नाकारता येत नाही, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.
शिंदेंना कोणताही शब्द दिला नव्हता…
एकनाथ शिंदेंना कोणताही शब्द दिला नव्हता असं महायुतीचे नेते म्हणत आहेत, या संबंधी सुप्रिया सुळेंना विचारलं असता, त्या म्हणाल्या, “तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कोणी कोणाला शब्द दिला, कोणी फिरवला. कारण 2019 मध्ये उद्धव ठाकरे हेच सांगत होते. 2019 मध्ये जसा कमिटमेंटचा विषय झाला तसाच 2024 मध्ये झालाय. हे फार रंजक आहे.” असं खासदार सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही त्यांच्याजागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो. राज्यात एवढे प्रश्न असताना हे शपथ का घेत नाहीत माहीत नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि महायुतीला लगावला आहे.
Edited by – Unmesh Khandale