राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदीची कोणाची मागणी असेल तर त्याची चर्चा व्हायला हवी – सुप्रिया सुळे

npc supriya sule criticized modi government shinde fadanvis govt on samrt city project in shirdi meeting

सोलापूर – पीएफआयवरील बंदीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी, अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली. सोलापूर दौऱ्यावर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अशा बंदीची कोणाची मागणी असेल तर या मागणीवर चर्चा व्हायला हवी. कुठलीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या चौकटीत राहून केल्या पाहिजे. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. यावेळी त्यांनी पीएफआयवरील बंदी संदर्भात संसदेतदेखील केंद्र सरकारला स्पष्टीकरण विचारणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून विरोधीपक्षांवर होणाऱ्या कारवाईवरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. काही दिवसांत ९० छापे विरोधीपक्षाच्या नेत्यांवर झाले. भाजपा लॉंड्रीत आल्यानंतर अनेकांची सुटका होते, असे भाजपाचेच नेते म्हणतात. मुळात ही महाराष्ट्राची संस्कृती कधीही नव्हती. जे घडतय ते अत्यंत दुर्दैवी आहे, त्या म्हणाल्या.

यावेळी त्यांनी महागाई आणि सिलिंडरच्या वाटपावरूनही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. एकतर नवरात्र, दिवाळी आहे. त्यात केंद्र सरकारने महिन्याला केवळ २ सिलेंडर देण्याचा निर्णय केला आहे. सिलिंडरची कमतरता आहे का? याचे उत्तर आधी केंद्र सरकारने द्यायला हवे, अशी टीका त्यांनी केली.