बारामती (पुणे) – बल आणि बुद्धीचे दैवत हनुमानाची आज जयंती आहे. यानिमित्ताने बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांनी कन्हेरी येथे येऊन मारुती मंदिराला भेट देऊन हनुमानाचे दर्शन घेतले. हनुमान जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र सरकारकवर दुष्काळाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे लक्ष फक्त पक्ष आणि लोकांची घरं फोडण्याकडे आहे, त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्यात सरकारला अपयश येत असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर अजित पवार यांनी काही आमदारांसह शिवसेना (शिंदे गट) – भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बारामतीसह राज्यात पाच ते सहा ठिकाणी लढत आहे. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा समाना सुरु आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या घड्याळ चिन्हावर लढत आहेत तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार तीनवेळच्या खासदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे आहेत. नणंद – भावजय असा हा सामना होत आहे.
कन्हेरी येथली मारुती मंदिरात सुप्रिया सुळे दर्शनासाठी आल्या. त्या म्हणाल्या की, मी बऱ्याच वेळा मारुती मंदिराला येते. माझ्या जन्माच्या अगोदर माझ्या कुटुंबाचे या कन्हेरीच्या मारुतीरायावर विश्वास, श्रद्धा, निष्ठा आहे. माझ्या आजी शारदाबाई आणि आजोबा गोविंदराव पवारांपासून ही परंपरा सुरू आहे. ती श्रद्धा, निष्ठा आजही आहे. आज हनुमान जयंती निमित्त सगळ्या मारुतीरायाच्या सर्व भक्तांना शुभेच्छा सुप्रिया सुळेंनी दिल्या.
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील श्री क्षेत्र कन्हेरी ता. बारामती येथील हनुमान मंदिराला भेट देऊन मारूतीरायाचे दर्शन घेतले. pic.twitter.com/pZU3k29gyg
— Supriya Sule (@supriya_sule) April 23, 2024
पाण्याच्या नियोजात सरकार अपयशी
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे तर काही भागात दुष्काळाची परिस्थिती आहे. याबद्दल सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे, तर काही ठिकाणी प्रचंड उन्हाळा आणि दुष्काळाची परिस्थिती आहे. मी सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करत आलेले आहे की, तुम्ही काहीतरी मार्ग काढा. सगळीकडे पिण्याच्या पाण्याचे आणि दुष्काळी परिस्थितीत नागरिकांच्या रोजगाराचे नियोजन करा. मात्र सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पक्ष फोड, घर फोड यामध्ये व्यस्त आहे. पाण्याचे नियोजन करण्यात हे सरकारला अपयश ठरले आहे, अशी टीका त्यांनी केली.
कन्हेरी येथूनच सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात
सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात काही दिवसांपूर्वीच कन्हेरी येथूनच झाला आहे. पवार घराण्यातील प्रत्येक उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कन्हेरी येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन पहिली सभा कन्हेरी गावात घेतात आणि प्रचाराची सुरुवात करतात. ही परंपरा सुप्रिया सुळे यांनीही कायम ठेवली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी कन्हेरीमध्ये काही दिवसांपूर्वीच जाहीर सभा घेतली होती. यावेळी आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांची उपस्थिती होती.
हेही वाचा : Lok Sabha Election 2024 : शिरुरमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; आढळरावांनी पराभव मान्य केलाय – अमोल कोल्हे
Edited by – Unmesh Khandale