घरमहाराष्ट्रमंत्र्यांनी केला बेळगाव दौरा रद्द, पवारांच्या आंदोलनाचा दाखला देत सुप्रिया सुळेंचा चिमटा

मंत्र्यांनी केला बेळगाव दौरा रद्द, पवारांच्या आंदोलनाचा दाखला देत सुप्रिया सुळेंचा चिमटा

Subscribe

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रद्द दौऱ्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांची एक आठवणही ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

मुंबई – महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आज कर्नाटकात जाणार होते. मात्र, कायदा सुव्यवस्थेचे कारण देत कर्नाटकात येऊ नका, असा आदेश कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी कर्नाटक दौरा तात्पुरता स्थगित केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रद्द दौऱ्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. यावेळी त्यांनी शरद पवारांची एक आठवणही ट्विटरद्वारे शेअर केली आहे.

कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद सुरु झाला असताना महाराष्ट्रातील मंत्र्यांचा बेळगाव दौरा कर्नाटकच्या तंबीनंतर रद्द करण्यात आला. ही बातमी वाचली आणि मला आदरणीय पवार साहेबांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण झाली, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची हकिकत सांगितली आहे.

- Advertisement -

हेही वाचा -चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा रद्द?, बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून नो एण्ट्रीचे आदेश जारी

सुप्रिया सुळेंनी शेअर केली आठवण

- Advertisement -

साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही. खुद्द एस एम जोशी देखील साहेबांच्या पाठीवर उमटलेले वळ पाहून हळहळले होते. तो काळच तसा होता. सीमाभागात राहणाऱ्या जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य केल्याची घोषणा केली. याविरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा निर्णय समितीने घेतला.

खुद्द एस एम जोशी यांनी १९८६ मध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. याअंतर्गत तीन दिवसांच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं. महाराष्ट्रातले नेते बेळगावमध्ये जाऊन भर चौकात निषेध नोंदवतील, असं ठरविलं. अर्थातच याला कर्नाटक सरकारने विरोध केला आणि महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी केली.

पहिल्या दिवशीच्या आंदोलनाचं नेतृत्व आदरणीय पवार साहेबांकडे होते. बेळगावात दाखल होण्यासाठी साहेबांनी एक शक्कल लढविली. ते कोल्हापुरात गेले. तिथून एक फियाट गाडी घेतली. सोबत बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला. साहेबांनी स्वतः ड्रायव्हर असल्याची बतावणी केली. खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं. तिघे जण निघाले. चेकपोस्टवर पोलिसांनी चौकशी केली परंतु त्यांना काहीच कळलं नाही.

साहेब बेळगावात पोहोचले पण कुणालाही थांगपत्ता लागला नव्हता. बेळगावात जमावबंदी होती. साहेब पूर्वीच पोहोचले असल्यामुळे अरविंद गोगटेंच्या घरी त्यांनी मुक्काम केला. आंदोलनाची वेळ झाली. बरोबर ११ वाजता राणी चेन्नमा चौकात लोक जमू लागले. अचानकपणे हजारो लोक जमल्याने पोलिस गोंधळले.

संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. साहेब, बाबासाहेब कुपेकर, आदींना पोलिसांनी बेदम मारहाण केली. साहेबांना हिडकल डॅमच्या परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं. तेथेही लोक जमा झाले. वयस्कर एस एम जोशी साहेबांना भेटायला गेले. त्यांनी साहेबांच्या पाठीवरील पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले. ते पाहून एसएम हळहळले होते. हा भारावलेला काळ कुठे आणि आजचा काळ कुठे? सारंच ३६० अंशात बदललंय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -