पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या जे काही सुरू आहे, त्यावरून सध्या सगळेच संभ्रमात आहेत. शरद पवार हे भाजपच्या विरोधात आहेत की ते त्यांना छुप्या पद्धतीने पाठिंबा देत आहेत, हे त्यांच्या सतत बदलत जाणाऱ्या वक्तव्यावरून तरी कळू शकलेले नाही. परंतु राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा केंद्रातही आणि राज्यातही विरोधातच असल्याचे स्पष्ट केले आहे. एबीपी माझाशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. (Supriya Sule targeted BJP and Chandrasheakhar Bawankule)
हेही वाचा – Supriya Sule : अजित पवारांना जे योग्य वाटले ते केले, सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली भूमिका
सुप्रिया सुळे या राज्यातील विविध प्रश्न हे लोकसभेत मांडत असतात. परंतु अजित पवार हे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते राज्याचे प्रश्न सोडविण्यास अपयशी ठरत आहेत का? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोणत्याही एका व्यक्तीवर असे आरोप करता येत नाही. कारण प्रत्येक गोष्टीची जबाबदारी ही प्रमुखाची असते. त्यामुळे हे अपयश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे आहे. कारण टीममध्ये अनेक लोक असतात. पण केंद्रबिंदू हे मुख्यमंत्री असतात, असे म्हणत सुळेंनी शिंदेंवर टीका केली आहे.
सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे भाजपला आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देतील, या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बावनकुळेंचे मी आभार मानते की त्यांनी आमचा पाठिंबा मागितला. मला भाजपचे कौतुक यासाठी वाटते कारण 303 खासदार, 200 पेक्षा अधिक आमदार असताना त्यांनी सुखाने नांदावे. पण शरद पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीवर भाजपचे विशेष प्रेम आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जात नाही, तोपर्यंत ते अस्वस्थ राहणार आहेत, असेच वाटायला लागले आहे. पण जर का माझ्याकडे 300 खासदार, 200 आमदार असते तर मी कशाला दुसऱ्याच्या घरात लक्ष घातले असते, असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे.
तर, आजची केंद्र सरकारची पॉलिसी मला मान्य नाही. त्यामुळे केंद्र सरकार कष्टकरी, शेतकरी, बेरोजगार यांच्याविरोधात आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आला आहे. या देशात या केंद्र सरकारकडून महागाई, बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्यविषया संदर्भात कोणतेही काम झाले नसल्याचे सुप्रिया सुळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.