मुंबई : राज्यभरातील विविध शासकीय रुग्णालयांमध्ये 100हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राज्य सरकारने या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी औषधविक्रीचा मुद्दा उपस्थित करत, निष्पक्ष चौकशीचे आव्हान सरकारला दिले आहे.
हेही वाचा – “याच आरोग्य यंत्रणेने कोरोना काळात केले उत्तम काम”, उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास खासदार सुप्रिया सुळे यांनी काल, गुरुवारी भेट दिली. तिथे नवजात अर्भक गमावलेल्या एका मातेने सुप्रिया सुळे यांना मिठी मारून हंबरडा फोडला. तब्बल 12 वर्षांनंतर या मातेची कुस उजवली होती, पण शासनाच्या दुर्लक्षामुळे ते बाळ तिच्यापासून हिरावून घेतले गेले. या मातेचे आणि आपले माणूस गमावलेल्या लोकांचे अश्रू या सरकारला दिसत नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
शासकीय रुग्णालयांत मृत्युच्या घटना उघडकीस आल्यानंतर गुरुवारी दि. ५ ऑक्टोबर रोजी येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. याप्रसंगी काही रुग्णांच्या नातेवाईकांशी व माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी दिलेली माहिती राज्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत काळजी वाढविणारी होती.
या रुग्णालयातील… https://t.co/4pdQS558Ay
— Supriya Sule (@supriya_sule) October 6, 2023
काही रुग्णांच्या नातेवाईकांशी तसेच माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी दिलेली माहिती राज्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत काळजी वाढविणारी होती. या रुग्णालयातील डॉक्टर रुग्णांना देणाऱ्या प्रिस्क्रिप्शनवर बाहेरची महागडी औषधे लिहून देतात. जी औषधे गोरगरीब जनतेला परवडणारी नसतात. राज्यातील बहुतेक शासकीय रुग्णालयांत हिच परिस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – निर्दयी आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, ठाकरे गटाची मागणी
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालय परिसरात एक जनऔषधी केंद्र उभारण्यात आले असून ते खासगी मालकीचे आहे. याची मालकी भाजपाचा पदाधिकारी असलेल्या एका व्यक्तीकडे आहे. तसेच, या केंद्रात जेनेरीक औषधांशिवाय खासगी औषधे देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत. डॉक्टर्स हीच औषधे प्रिस्क्रिप्शनवर लिहून देतात असे रुग्णांचे म्हणणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शासकीय रुग्णालयाच्या जागेत भाजपा पदाधिकाऱ्याच्या मालकीचे हे खासगी जनौषधी केंद्र कसे काय उभारले गेले याची चौकशी होणे गरजेचे आहे. शिवाय, शासकीय रुग्णालयांत औषधांचा तुटवडा जाणीवपूर्वक निर्माण केला जात आहे का आणि याचे थेट लाभार्थी कोण आहेत याची निष्पक्ष चौकशी करण्याची हिंमत या शासनाने दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले आहे.