घर महाराष्ट्र सुप्रिया सुळेंच्या नावाचा प्रस्ताव अजित पवारांनीच दिला होता, राष्ट्रवादीच्या महिला खासदाराचा खुलासा

सुप्रिया सुळेंच्या नावाचा प्रस्ताव अजित पवारांनीच दिला होता, राष्ट्रवादीच्या महिला खासदाराचा खुलासा

Subscribe

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली त्यावेळी अजित पवारांनीच अध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.

नवी दिल्लीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25वा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीवर भाकरी फिरवत पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. या दोघांचीही पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यावेळी सुनिल तटकरे, जितेंद्र आव्हाड, डॉ. योगानंद शास्त्री, के.के. शर्मा, फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड यांच्यावर पक्षाची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर कोणतीही विशेष जबाबदारी देण्यात आली नाही. ज्यानंतर अजित पवार यांनी कार्यक्रमातून लगेच काढता पाय घेतला. पण ज्यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली त्यावेळी अजित पवारांनीच अध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले.

हेही वाचा – Big News : शरद पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

- Advertisement -

अजित पवार यांच्याकडे पक्षाची कोणतीच जबाबदारी सोपविण्यात न आल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे. पण असे असले तरी राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी याबाबत नकार दिला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभेतील खासदार वंदना चव्हाण यांनी या निर्णयामुळे अजित पवार का नाराज नसणार, याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे.

यावेळी बोलताना वंदना चव्हाण म्हणाल्या की, “सुप्रिया सुळे यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली याचा आनंद आहे. प्रफुल्ल पटेल पक्षाचे उपाध्यक्ष तर होतेच. अन्यही ज्येष्ठ नेत्यांवर वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला आहे. ते परत मिळवण्यासाठी सर्व राज्यांत पक्षाचा विस्तार करावा लागेल.”

- Advertisement -

तसेच, शरद पवार निर्विवाद पक्षाचे नेतृत्व करतात. त्यामुळे नंतर पक्षाचे नेतृत्व सुप्रिया सुळे की अजित पवार यांच्याकडे जाणार या गोष्टीचा आम्ही विचारसुद्धा करत नाही. शरद पवारांनी राजीनामा मागेच घेतला नसता तर… तेव्हा अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना कार्यकारी अध्यक्ष करावे, असा प्रस्ताव दिला होता, असा खुलासा वंदना चव्हाण यांच्याकडून करण्यात आला आहे.

तर, अजित पवार यांनी देखील नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार आपल्या संदेशात म्हणतात की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘ऱ्हदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र’… हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचे योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पादाधिकारी याच ध्येयाने काम करतील, हा विश्वास आहे. नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांचे पुन:श्च अभिनंदन, असं ट्वीट पवारांनी केलं आहे.

- Advertisment -