मुंबई : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत आपल्याविरोधात बातमी छापून येऊ नये, यासाठी पत्रकारांना सांभाळून घेण्याचा सल्ला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. त्यावरून महाराष्ट्र भाजपाने सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा एक व्हिडीओ शेअर करत तुम्ही कोणत्या परंपरेच्या वाहक आहात? असा सवाल विचारला आहे.
हेही वाचा – ही तर मतदारांची प्रतारणा…, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून अरविंद सावंतांची टीका
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याचअनुषंगाने भाजपाने कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी अहमदनगर येथे भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पत्रकारांबद्दल दिलेल्या ‘कानमंत्रा’ची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. ज्या बुथवर तुम्ही काम कराल, तेथील पत्रकारांची यादी तयार करा, महाविजय 2024पर्यंत आपल्याविरोधात काही येणार नाही, याची काळजी घ्या. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे हे समजले असेल, असा सल्ला बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर जी बावनकुळे यांच्यावर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या पिताश्रींचा हा व्हिडिओ जरा नजरेखालून घालावा.
शरद पवार साहेब पत्रकारांचे आदरातिथ्य कसे करतात बघा? स्पष्ट आणि रोखठोक प्रश्न विचारला की, पत्र परिषदेतून पत्रकारांना निघून जाण्यास… pic.twitter.com/hc9AqZ4iCq
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 26, 2023
यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत भाजपावर जोरदार टीका केली आहे. विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे ही विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचे काम त्यांचे आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – एखाद्या पूरग्रस्ताचे तोंड तात्पुरते बंद करू शकाल, पण…; ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा
तर आता, महाराष्ट्र भाजपाने 2019मध्ये शिर्डी येथे झालेल्या शरद पवार यांच्या एका पत्रकार परिषदेचा व्हिडीओ शेअर केला आहे. नातेवाईक पक्ष सोडून जात असल्याबद्दल एका पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर शरद पवार संतप्त झाले. ‘अशा लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना सभ्यता नाही. माझी विनंती आहे, अशा लोकांना बोलवत जाऊ नका… निदान मला. यांना बोलवणार असाल, तर मला बोलावू नका… आपण निघून गेलात तर बरं होईल,’ असे त्या पत्रकाराला बोलताना शरद पवार दिसत आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी आपल्या पिताश्रींचा हा व्हिडीओ जरा नजरेखालून घालावा. शरद पवार हे पत्रकारांचे आदरातिथ्य कसे करतात बघा? स्पष्ट आणि रोखठोक प्रश्न विचारला की, पत्र परिषदेतून पत्रकारांना निघून जाण्यास सांगणे, त्यांना अपमानित करणे हीच पवार यांची परंपरा आहे. बावनकुळे यांनी पत्रकारांना असे अपमानित कधी केले नाही, असे म्हणत, सुप्रियाताई, तुम्ही कोणत्या परंपरेच्या वाहक आहात? असा सवाल भाजपाने केला आहे.