बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण समोर आल्यानंतर भाजपा आमदार सुरेश धस हे आक्रमक झाले आहेत. ते मंत्री धनंजय मुंडे, वाल्मीक कराड आणि बीड पोलिसांबाबत अधूनमधून खुलासा करताना करताना दिसत आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा बीड पोलिसांबाबत आरोप केला आहे. त्यांनी म्हटले की, परळीत काही अधिकारी 20 वर्षांपासून एकाच पोस्टवर आहेत. या अधिकाऱ्यांना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी एकाच पोस्टवर राहण्याची परवानगी याची माहिती घेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार आहे. (Suresh Dhas alleges that some officers in Parli have been in the same post for 20 years)
सुरेश धस म्हणाले की, वाल्मीक कराडला फरार होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे नंबर, पुरावे, कागदपत्रं मी पोलिसांडे दिले आहेत. ते सगळे सहआरोपी झाले पाहिजेत, अशी मागणी मी केली आहे. तसेच परळी नगरपालिकेचे विशेष ऑडिट होणे गरजेचे आहे. कारण एका एका व्यक्तीच्या नावे 46 कोटी उचलले गेले आहेत. आरोपी विष्णू चाटेच्या नावेही पैसे उचलले गेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे एकाच रस्त्यासाठी पाच वेळा पैसे उचलले आहेत. त्यामुळे सर्व माध्यमांना विनंती करतो की, तुम्ही कॅमेरा घेऊन परळीत फिरावं आणि कोणता रस्ता योग्य आहे, याचं प्रमाणपत्र तुम्हीच द्यावे, असे आवाहन धस यांनी केले.
हेही वाचा – Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिलमध्ये विसरा, ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता
भास्कर केंद्रे नावाचा एक पोलीस अधिकारी 15 वर्षांपासून बीडमध्येच आहे. त्याचे 15 जीसीबी आहेत. 100 राखेचे टिपर आहेत. मटकावाल्याची अर्धी भागिदारी आहे, असे गंभीर आरोप करत सुरेश धस म्हणाले की, परळी थर्मललाही गेल्या 20 वर्षांपासून काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवर आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बदली अधिनियम 3 वर्षांचा आहे. जास्तीत जास्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी एकाच पोस्टवर 4 वर्षांपर्यंत राहू शकतात. जर त्यांना पाचव्या वर्षीपण एकाच पोस्टवर राहायचे असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागले. त्यामुळे परळी थर्मलमधल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोणत्या मुख्यमंत्र्यांनी 20 वर्षांपर्यंत एकाच पोस्टवर राहण्याची परवानगी दिली, यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांच्या स्वतंत्र विभागाला पत्र देत आहे, असे धस यांनी सांगितले.
परळी थर्मलमधले अवैध राखेचे जे साठे आहेत, ते साठे जप्त करण्यात यावेत. ते साठे कोणाचे आहेत, त्या सर्वांची यादी माझ्याकडे आहे. ती यादी मी पोलिसांकडे देणार आहे. थर्मलच्या अधिकाऱ्यांकडेही देणार आहे. त्यामध्ये कोण-कोण लोक आहेत, त्यांची नावे उद्या समोर आल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसेल. दुसरं म्हणजे अवैध वाहतूक आजही परळी थर्मलमध्ये सुरू आहे. दिवसा अवैध वाहतूक घाबरून बंद असली तरी रात्री राख उचलली जात आहे. ही राख बाहेरच्या राज्यातील, जिल्ह्यतील बंद झाली असली तरी आमच्या जिल्ह्यांअंतर्गत सुरू आहे. त्यामुळे ही अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणीही सुरेश धस यांनी केली.
हेही वाचा – Devendra Fadnavis : पुण्यात भारत-इंग्लंड सामना, GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सूचना