मुंबईतून सुरेश कोपरकर यांचा अर्ज दाखल, दोन जागांसाठी तीन उमेदवारांचे अर्ज

विधान परिषदेच्या पाच स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई – येत्या १० डिसेंबरला होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. कोपरकर यांचा अर्ज कायम राहिल्यास मुंबई मतदारसंघासाठी निवडणूक अटळ आहे.

विधान परिषदेच्या पाच स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. मुंबई महापालिकेत उमेदवार निवडून येईल इतके संख्याबळ नसल्याने काँग्रेसने इथे उमेदवार दिलेला नाही. निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून अखेर आज कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यांना काँग्रेसचे समर्थन असल्याची चर्चा आहे

दरम्यान, मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी आज अर्ज भरला. त्यामुळे मुंबईत दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या अर्जांची छाननी आज, बुधवारी होणार असून अर्ज माघारीची मुदत २६ नोव्हेंबर २०२१ अशी आहे. त्यामुळे २६ नोव्हेंबर नंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल.

मुंबईतील उमेदवार

राजहंस सिंह – भाजप
सुनील शिंदे – शिवसेना
सुरेश कोपरकर – अपक्ष