मुंबईतील ८० टक्के झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण

Mumbai slume

मुंबईसह ठाणे शहराला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने कंबर कसली आहे. यावेळी झोपड्यांचे अत्याधुनिक जीआयएस पद्धतीने मॅपिंग करण्यात येत असून मुंबईतील सुमारे ८० टक्के झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. आता एसआरएने मुंबईपाठोपाठ ठाणे शहरातील सर्वेक्षणाला सुरूवात केली आहे. त्यामुळे ठाण्यातील झोपड्यांचे सर्वेक्षण सुरू असून सर्वेक्षणाचे काम पूर्ण होताच एसआरए योजनांना गती मिळणार आहे.

मुंबईतील ८० टक्के झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असले तरीही एसआरए अंतर्गत झोपड्यांच्या सर्वेक्षणात विमानतळ आणि केंद्र सरकारच्या जागेवरील झोपड्यांचे सर्वेक्षण झालेले नाहीये. कोणत्याही प्रकारची अद्याप परवानगी न मिळाल्यामुळे येथील सर्वेक्षण रखडलेले आहे.

मुंबईसह राज्याला झोपडपट्टीमुक्त करण्याचा संकल्प तत्कालीन सरकारने २०१५ मध्ये आखला होता. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी एसआरएने पुढाकार घेत झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम सुरू केले. मात्र, गेल्या पाच वर्षामध्ये कामात आवश्यक असलेले उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. त्यामुळे एसआरएने झोपड्यांचे जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकार, म्हाडा, जिल्हाधिकारी, रेल्वे आणि खासगी जमिनीवर वसलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. यामध्ये सर्वेक्षणाच्या विभागानुसार ८ लाख झोपड्यांची माहिती जमा करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात झोपड्यांचे ठिकाण आणि इतर माहिती जमा करण्यात आली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात झोपडपट्टीमध्ये राहणारे व्यक्तिंचे फोटो, कागदपत्रे आणि झोपडीचा संपूर्ण व्हिडीओ देखील घेण्यात येणार आहे.


हेही वाचा : मातोश्रीवर शिवसेना खासदारांची बैठक, उद्धव ठाकरे धक्कातंत्राचा अवलंब करणार?