४८ तासात जाहीर माफी मागा; सुशांतच्या भावाची संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस

sanjay raut and sushant singh rajput

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात दिवसेंदिवस नवेनवे खुलासे समोर येत आहे. अनेकजण वेगवेगळे दावे करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केलं असून त्यांचं दुसरं लग्न सुशांतला मान्य नव्हतं असा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार यांने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ‘टाइम्स नाऊ’ने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

संजय राऊत यांनी सामनामधून लेखातून सुशआंत प्रकरणावर भाष्य केलं होतं. संजय राऊत यांच्या विधानावर आक्षेप घेत सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार याने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नीरजने संजय राऊत यांना ४८ तासात जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा, असं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?

सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यातील संबंध फारसे चांगले नव्हते. संजय राऊत यांनी सामनामधून हा दावा केला होता. सुशांत वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश नव्हता. शिवाय, सुशांत सिंह राजपूत किती वेळा आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी पाटण्याला गेला होता? असा सवालही त्यांनी केला होता. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमागील सत्य बाहेर येऊ नये यासाठी राजकारण करण्यात आलं. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून हे प्रकरण काढून घेण्यात आलं, असा आरोपही संजय राऊत यांनी केला होता. सुशांतच्या कुटुबीयांकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते.