घरदेश-विदेशआत्‍महत्‍येनंतरचा गुंता

आत्‍महत्‍येनंतरचा गुंता

Subscribe

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा गुंता दिवसेंदिवस वाढत चालला असून मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवला जात असताना आता या प्रकरणात राजकीय नेतेही गुंतले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या सार्‍या प्रकारामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलेच संतापले असून ‘मुंबई पोलिसांवर आरोप करणार्‍यांची मी निंदा करतो’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर कडक लॉकडाऊनच्या काळात सुशांत सिंहच्या घरी पार्टी कशी झाली आणि त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होते, याची मुंबई पोलिसांनी चौकशी करावी, असा नवा ट्विस्ट शिवसेनेचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिलाय. दुसरीकडे मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना बिहार पोलिसांनी समांतर तपासाला सुरुवात केलीय...

पोलिसांवर आरोप करणार्‍यांची निंदा करतो-मुख्यमंत्री

सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणार्‍यांचा मी तीव्र निषेध करतो. या प्रकरणात पोलिसांवर आरोप करू नयेत. त्यांच्यावर आरोप म्हणजे कोविड योद्ध्यांवर आरोप असून जे कोणी असे आरोप करत आहेत त्यांची मी निंदा करतो, असा संताप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. हे प्रकरण सोडविण्यास मुंबई पोलीस पूर्णपणे सक्षम आहे. कोणाकडे काही पुरावा किंवा माहिती असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांना द्यावी. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या तळाशी जाऊन जो कोणी दोषी असेल त्याविरूद्ध कठोर कारवाई निश्चित करेल, असे ठाकरे म्हणाले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे भाष्य केले.

- Advertisement -

यावेळी ठाकरे यांनी सुशांतच्या मृत्यूचे राजकारण केले जात असल्याचा गंभीर आरोपही केला. आम्ही सुशांतच्या कुटुंबिय, चाहत्यांच्या भावना समजू शकतो; पण मी या सर्वांना एक विनंती करतो की आपण या विषयावर होत असलेल्या राजकारणाचा भाग बनू नका, असे ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सुशांतच्या मृत्यूबद्दल राजकारण केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर अविश्वास दाखविल्याचा आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले, देवेंद्र फडणवीस जेव्हा ते मुख्यमंत्री होते, तेव्हा या मुंबई पोलिसांमुळेच ते मुख्यमंत्री राहू शकले. त्यांच्याकडूनही अपेक्षा नव्हती.

- Advertisement -

भाजपकडून प्रकरण तापवण्याचा प्रयत्न

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असताना विरोधी पक्ष भाजपने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी केली आहे. हे कमी म्हणून की काय ईडीने या प्रकरणात उडी घेतली असून दोन दिवसांपासून बिहार पोलिसांनीही समांतर तपासाला सुरुवात केल्याने तपासात भाजप या प्रकरणात खुपच उत्सुकता दाखवतेय, असे चित्र निर्माण झाले आहे. वेगळा तपास करून या निमित्ताने मुंबई पोलिसांबरोबर ठाकरे सरकारच्या कारभारावर अपयशाचा शिक्का मारण्याचा भाजपचा हा प्रयत्न असू शकतो, असे बोलले जात आहे.

बिहार पोलिसांचा समांतर तपास सुरू

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी मुंबईत समांतर तपासाला सुरुवात केली आहे. शुक्रवारी सिनेदिग्दर्शक महेश छाब्राची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, तर लवकरच सुशांतच्या सीएची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. सुशांतच्या आत्महत्येसंदर्भातील काही महत्त्वाच्या कागदपत्रांची मागणीही बिहार पोलिसांकडून वांद्रे पोलिसांकडे करण्यात आली आहे. १४ जूनला सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती.

या गुन्ह्यांचा वांद्रे पोलिसांकडून तपास सुरु असतानाच सुशांतचे वडील कृष्ण किशोर सिंह यांनी बिहारच्या राजीवनगर पोलीस ठाण्यात सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्याविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर रियाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांच्या चार जणांचे एक विशेष पथक मुंबईत दाखल झाले आहे.

या पथकाने दोन दिवसांपूर्वी सुशांतच्या तीन बँकांत असलेल्या बँक खात्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. सुशांतच्या बँक खात्यातून कोणाला, कधी आणि कशासाठी पैसे देण्यात आले होते. सुशांतच्या बँक खात्यातून रियाने परस्पर काही आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे शुक्रवारी सुशांतचा मित्र आणि सिनेदिग्दर्शक महेश छाब्रा याची बिहार पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याचा जबाब नोंदविण्यात आला होता. या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. शनिवारी सिनेदिग्दर्शक व लेखक रुमी जाफरी यांचीही बिहार पोलिसांनी चौकशी केल्याचे सांगितले जाते. लवकरच सुशांतच्या सीएची पोलिसांकडून जबानी नोंदवून चौकशी केली जाणार आहे.

दुसरीकडे बिहार पोलिसांनी वांद्रे पोलिसांकडे सुशांतच्या अपमृत्यूची नोंद असलेली कागदपत्रे, डायरी, शवविच्छेदन अहवालासह फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची मागणी केली आहे. याबाबत पोलिसांनी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे, या निर्णयानंतर बिहार पोलिसांना संबंधित कागदपत्रे देऊन त्यांना तपासकामात सहकार्य केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरी पार्टी कशी झाली-अ‍ॅड. अनिल परब

राज्यातल्या विरोधी पक्ष असलेल्या भाजपने सुशांत सिंह प्रकरणात राज्य सरकारमधील एका तरूण मंत्र्याचा समावेश असल्याचा खळबळजनक आरोप केल्यानंतर आता खुद्द सत्तेतल्या एका मंत्र्यानेच सवाल उपस्थित केला आहे. परिवहन मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिल परब ट्विट करतात, ‘कडक लॉकडाऊनच्या काळात सुशांत सिंहच्या घरी पार्टी कशी झाली आणि त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होते, याची देखील मुंबई पोलिसांनी चौकशी करावी. मुंबई पोलीस सक्षम असल्यामुळे तेच या प्रकरणाचा छडा लावतील. या प्रकरणात सध्या भलतेच राजकारण होऊ लागले आहे. ज्यांच्याकडे या प्रकरणाबद्दल माहिती आहे, त्यांनी तात्काळ ती माहिती मुंबई पोलिसांना द्यावी. माझे पोलिसांना देखील आवाहन आहे की त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -