घरमहाराष्ट्रबॉम्बसदृश्य वस्तूने मच्छिमारांची धावपळ, पालघरच्या समुद्र किनाऱ्यावरील घटना

बॉम्बसदृश्य वस्तूने मच्छिमारांची धावपळ, पालघरच्या समुद्र किनाऱ्यावरील घटना

Subscribe

केळवे पोलिसांनी वेळीच धाव घेत वस्तू केली नष्ट, सणासुदीच्या दिवसांत

दिल्ली पोलिसांनी अटक केलेले दहशतवादी आगामी सणासुदीत घातपात घडवणार असल्याची माहिती उघड झाल्याने सर्वत्र सतर्कता बाळगली जातेय. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनादेखील सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. त्यातच पालघर तालुक्यातील कोरे समुद्र किनाऱ्यावर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने मच्छिमारांची चांगलीच धावपळ झाली. या वस्तूमधून धूर बाहेर पडत असल्याने मच्छिमारांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली.

स्थानिक मच्छीमारांकडून माहिती मिळताच केळवे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बॉम्बशोध आणि नाशक पथकदेखील त्यांच्यासोबत होते. या पथकाने ही स्फोटक वस्तू नष्ट केली. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेत काही मच्छिमारांना समुद्र किनाऱ्यावर खडकामध्ये बॉम्बसदृश्य वस्तू दिसली होती. त्यातून धूर निघत असल्याने मच्छिमारांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

- Advertisement -

फॉस्फरस ठरला असता घातक

सुमारे २ फुट लांबीच्या या वस्तूवर मार्कर लिहिलेले होते. त्यात फॉस्फरस असल्याने हाताळू नये, अशीही सूचना होती. ही वस्तू ज्वलनशील असल्याने बॉम्बशोध आणि नाशक पथकाने धाव घेत ती नष्ट केली. या पथकाच्या वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार ही वस्तू रुट मार्कर होती. त्यातील फॉस्फरसचा हवेशी संपर्क आल्यास ती पेट घेते. पथकाने जाळून ही वस्तू नष्ट केल्यानंतर स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या संपूर्ण कार्यवाहीदरम्यान किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी तब्बल दीडशे तरुणांचं पथक तैनात करण्यात आलं असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांनी दिली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -