घरताज्या घडामोडी‘नाशिक 151’च्या माध्यमातून साधणार शाश्वत विकास

‘नाशिक 151’च्या माध्यमातून साधणार शाश्वत विकास

Subscribe

पालकमंत्री छगन भुजबळ : कलाग्राम, बोटक्लब व क्रिडा संकुल प्रकल्प पुर्ण करण्याचा मानस

जिल्ह्याच्या स्थापनेला यावर्षी 151 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्ह्यात ‘नाशिक 151’ अंतर्गत अनेकविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच ‘नाशिक 151’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण अशा घटकांचा शाश्वत स्वरूपात विकास करण्यावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात ‘नाशिक 151’ कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे, विविध महोत्सवाचे आयोजन करणे व कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र तयार करणे अशा तीन टप्प्यात ‘नाशिक 151’ या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

यादरम्यान कलाग्राम, बोटक्लब व क्रिडा संकुल या प्रकल्पांना पूर्ण करण्यात येणार असून जिल्ह्यातील कृषी, गायन, साहित्य, पर्यटन, क्रिडा अशा विविध घटकांचा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक हेरिटेज गार्डन, रामसृष्टी प्रकल्प, लेझर शो आणि नाशिक जिल्ह्याच्या 150 वर्षातील प्रगतीचे टप्पे दर्शविणारे असे कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्राची निर्मीती यानिमित्ताने करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी नियोजनाचे सादरीकरण करतांना पालकमंत्री भुजबळ यांना दिली. या बैठकीला महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी आदी उपस्थित होते.

‘नाशिक 151’ या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी आपल्या जिल्ह्यास 25 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आदिवासी कलेपासून पैठणीपर्यंत तर शेतीपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत अशा सर्व घटकांना एकत्रित व्यासपीठ मिळावे यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील बहुसांस्कृतिक वैशिष्ट्यांचे जतन करून ते जगासमोर आणण्यासाठी कायमस्वरूपी असे प्रदर्शन केंद्र तयार करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाविन्यपूर्ण प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार असून संबंधित विभागांच्या मदतीने नाशिक 151 अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये दूरगामी सुविधा असणारे प्रकल्प तयार करण्यात येतील. यातून नाशिकचा ठसा सर्वत्र उमटेल यासाठी ‘नाशिक 151’ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -