शाडूच्या मातीला आकार देणाऱ्या वेंगुर्ल्याच्या सुवर्णाताई

कोकणातील वेंगुर्ल्यात राहणाऱ्या सुवर्णाताई बंगे शाडू मातीच्या मूर्त्या घडवतात. याचे प्रशिक्षणही शाळेतील विद्यार्थ्यांना दिले जाते. यानिमित्ताने पर्यावरणाचा समतोल राखण्याबाबत जनजागृतीही केली जाते.

suvarna bange
मूर्तीकार सुवर्णा प्रभाकर बंगे

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे मुर्तीकारांची लगबग सुरु आहे. ठाण्यात विविध ठिकाणी गणेशमुर्तीकारांचे विक्री स्टॉल लागण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे महानगरपालिकेने आदेशाची अंमलबजावणी करत तर काही ठिकाणी नियमांना बगल देत गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरु केली आहे. मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात पर्यावरण जनजागृतीचे वारे जोरात वाहत आहेत. त्यात प्लास्टीकसह थर्माकोलवरही बंदी आली आहे. मोठाल्या मुर्त्यांचा प्रश्नही अद्याप धगधगत आहे. मोठ्या मूर्त्या आणि त्यातही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या पर्यावरणाला घातक असल्याचे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. मात्र अद्यापही यावर ठोस उपाययोजना होत नसल्याने याची जनजागृती होणे काळाची गरज आहे. हेच कार्य मागील १९ वर्षांपासून ठाण्यात पर्यावरण दक्षता मंचच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

उत्सवाला आले बाजारीकरण 

पूर्वी पारंपारिक गणेशोत्सव साजरी होतांना शाडू मातीच्या मुर्त्यांना प्राधान्य दिले जात होते. परंतू, जागतिकीकरणाच्या बाजारात उत्सवाचे स्वरुपही बदलले आणि या बदलत्या स्वरूपाने साचेबंद प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मुर्त्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या या मुर्त्यांच्याबाबत जनजागृतीची मोहीम सर्वच स्तरावर होत असल्यामुळे आज पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. यातून शाडू मातींच्या मुर्त्यांना पुन्हा एकदा बाजारपेठ मिळू लागली आहे. मागणी वाढू लागल्यामुळे ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंचच्या माध्यमातून या मूर्त्या तयार करण्यास सुरुवात झाली आहे. या मूर्त्या तयार करण्याची सर्वस्वी जबाबदारी सुवर्णा प्रभाकर बंगे या सांभाळत आहेत. पर्यावरणाला पुरक अशा शाडू मातीच्या मूर्त्या गेल्या चार ते पाच वर्षांपासून त्या तयार करत आहेत.

स्वतःच्या कल्पनेने मूर्ती घडवली

मुळच्या कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे गावातमधील सुवर्णा बंगे यांचा घरामध्ये मूर्ती बनवण्याचा पारंपारिक व्यवसाय आहे. त्यातूनच त्यांना मूर्त्या घडवण्याची आवड निर्माण झाली. मात्र साचेबद्ध मूर्त्या बनविण्यापेक्षा स्वतःहून निर्माण केलेली मूर्ती अधिक आनंद देते या भावनेने त्यांनी स्वतःच्या कल्पनेने मूर्त्या तयार करण्यास सुरुवात केली. यात त्यांना मोठे यश प्राप्त झाले. त्यांची कला आजूबाजूच्या गावातील लोकांसह अनेक ठिकाणी पोहोचली आणि लोकांचा या स्वनिर्मित शाडू मातीच्या मुर्त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. तीच परंपरा त्या मागील पाच वर्षापासून ठाण्यात जोपासत आहेत. ठाणेकर देखील याला चांगलाच प्रतिसाद देत आहेत. या संस्थेच्या माध्यमातून बंगेमावशी केवळ मूर्त्या बनवत नाहीत, तर त्या बनवण्याचे प्रशिक्षणही देतात. या माध्यमातून त्या शाडूच्या मुर्त्यांचे महत्त्व लोकांना समजावून सांगत आहेत.

पाण्यात सहज विरघळते ही मूर्ती

शाडू मातीच्या मूर्त्या बनवण्याकरता ही माती प्रक्रिया करूनच आणली जाते. कोरड्या मातीचे एक एक किलोचे गोळे असतात. ही माती कल्याणहून आणली जाते. मग ज्यांना जशी मूर्ती हवी, तशी ती बनवून आमच्या केंद्राकडून उपलब्ध करून दिली जाते. या मूर्ती बनविण्यासाठी कोणताही साचा नाही. शिवाय शाडूच्या मुर्तींचे विसर्जन घरीही करता येते. काही क्षणातच ही मूर्ती पाण्यात विरघळते आणि ती माती तळाला जाऊन बसते. पाणी फेकून दिल्यानंतर ही माती पुन्हा वापरात आणता येते. मात्र या मुर्तींना रंग देतांना चंदन, हळद आणि कुंकू याचाच वापर करावा लागतो. जेणेकरून या गोष्टीही पर्यावरणाला हानी पोहोचवत नाहीत, अशी माहिती या संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.

संस्थेने शाळांमध्ये प्रशिक्षणा दिले 

शाडू मातीच्या मूर्त्या या प्रशिक्षणाद्वारेच बनवता येतात. त्यासाठी संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण ठाणे जिह्यातील अनेक शाळांसह विविध ठिकाणी शिबिरांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. ठाण्यात सुमारे चार हजारांहून अधिक जणांना याचे प्रशिक्षण दिले आहे. डॉ. बेडेकर विद्यामंदीर, श्रीराम विद्यालय, रेमण्ड ग्रुप यांच्यासह अगदी खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांच्या पत्नी मेघा सोमण यांनाही संस्थेने प्रशिक्षण दिले आहे, असेही ते सांगतात.

गणेशोत्सव हा श्रद्धेचा सण आहे. या श्रद्धेचे सध्या व्यावसायिकीकरण झाले आहे. मोठमोठ्या मूर्त्या आणणे म्हणजे आपण किंवा आपले मंडळ खूप मोठे आहे, असा भास निर्माण करणे. मात्र या दैवताला आपण स्वतःच तयार करून त्याची प्रतिष्ठापना करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तो आज अनेकांच्या मनात रुजू लागला आहे. मूर्ती छोटी असावी जेणेकरून तिचे विसर्जनही व्यवस्थितरित्या होऊ शकेल. आपण पर्यावरणाशी एकरूप असलेले उत्सव साजरी करणे ही काळाची गरज आहे.
– सुवर्णा प्रभाकर बंगे, मूर्तीकार

पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, कारण पर्यावरणाचा समतोल असेल तर मानवी जीवन सुरळीत असेल. अन्यथा मानवी जीवनाचाही ऱ्हास होईल. या हेतूने शाडू मातीच्या मुर्त्यांचा आम्ही प्रचार करत आहोत. त्याला प्रतिसादही फार चांगला मिळत आहे. आजपर्यंत हजारांहून अधिक मुर्त्यांची मागणी आम्ही पूर्ण केली आहे. दिवसेंदिवस ही मागणी वाढतच आहे. याचा अर्थ लोकांमध्ये पर्यावरण विषयक आस्था निर्माण होत आहे, ही समाधानाची बाब आहे.
– शीतल झंडे, पर्यावरण दक्षता मंच