जुने नाशिकमध्ये तरुणाकडून तलवार जप्त

बेकायदा तलवार बाळगणार्‍या तरुणास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून अटक केली. पथकाने त्याच्या ताब्यातून घरातील पलंगाखाली लपवून ठेवलेली तलवार जप्त केली. मोहमंद कैफ साजीद शेख (वय १९, रा.कच्छी एन्टरप्राईजेसजवळ, बागवानपुरा, जुने नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार मुक्तार शेख हे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना बागवानपुरा, जुने नाशिक येथील कैफ शेख हा बेकायदेशीर एक तलवार बाळगत असून, त्याने तलवार घरामध्ये लपवून ठेवली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रामदास भडांगे, प्रवीण कोकाटे, आसिफ तांबोळी, मुक्तार शेख, नाझीम पठाण यांनी बागवानपुरा परिसरात छापा टाकला. त्यावेळी मोहमंद शेख राहत्या घरात मिळून आला. पथकाने त्याच्या ताब्यातून पलंगाखाली लपवलेली एक हजार रुपये किंमतीची तलवार जप्त केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.