Coronavirus: तबलीगी जमातच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची अकोल्यात आत्महत्या

suicide due to coronavirus
प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना विषाणूचा अहवाल पॉझिटिव्ह झाल्यानंतर तबलीगी जमातच्या एका ३० वर्षीय सदस्याने अकोला येथील रुग्णालयात आत्महत्या केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यानंतर आज सकाळी त्याने आत्महत्या केली. आयसोलेशन वॉर्डमध्ये आज सकाळी त्याने गळ्याभोवती ब्लेड मारून स्वतःला जखमी केले. त्यानंतर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. मृत रुग्णाचे नाव मोहम्मद जहरुल इस्लाम असे आहे. तो मूळचा आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातला रहिवासी आहे. अकोल्यातील तबलीग जमातीच्या लोकांबरोबर तो दिल्लीतील मरकजहून अकोल्यात आला होता.

अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात सदर रुग्णाला ७ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी त्याच्या आयसोलेशन वॉर्डमधील स्वच्छता गृहात गळा चिरलेल्या अवस्थेत तो आढळून आला. रुग्णालय कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याच्यावर उपचार सुरु केले. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. कालच त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कोरोना व्हायरसच्या भीतीने आत्महत्या करणाऱ्यांचा आकडा हा धक्कादायक पद्धतीने वाढत आहे. आज तामिळनाडू राज्यात देखील एका रुग्णाने रुग्णालयातच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अरियालुर येथे कोरोना संशयित रुग्णाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. या ६० वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली. मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. आता तेथील पोलीस या आत्महत्येमागे दुसरे कारण तर नव्हते ना, याचा तपास करत आहेत.

आज शनिवारी महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या वाढून ती १ हजार ६६६ वर पोहोचली आहे. आज नव्याने ९२ रुग्णांची भर पडली.