Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश अमित शहांवर कारवाई करा, कलावती बांदुरकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

अमित शहांवर कारवाई करा, कलावती बांदुरकरांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी

Subscribe

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी कलावती बांदूरकर यांच्याविषयी लोकसभेत खोटी माहिती दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कलावतींनी केली आहे.

यवतमाळ : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून लोकसभेतील पावसाळी अधिवेशन चांगलेच तापले आहे. गेले तीन दिवस लोकसभेत मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी मोदी सरकारविरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाली. या अविश्वास प्रस्तावावर मंगळवारपासून (ता. 08 ऑगस्ट) सुरुवात करण्यात आली. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या प्रस्तावावरून दोन दिवस चर्चा झाली. बुधवारी (ता. 10 ऑगस्ट) राहुल गांधी यांनी या प्रस्तावावर भाषण केले. त्यांच्या या भाषणाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तर देण्यात आले. 15 वर्षाआधी कलावती बांदूरकर यांच्या भेटीचा उल्लेख करीत त्यांचे पुढे काय झाले? असा सवाल करीत अमित शहांनी टीका केली. अमित शहा यांनी कलावतींचा संसदेत विषय काढल्याने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

हेही वाचा – मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदी बोलत नसल्याने विरोधकांचा वॉकआऊट; राष्ट्रवादीचा एकच खासदार सभागृहात

- Advertisement -

राहुल गांधी यांनी त्यांच्या घरी जाऊन जेवण केले पण दिले काहीच नाही, असा दावा अमित शहांकडून संसदेत करण्यात आला. पण शहांनी केलेल्या दाव्याची पोलखोल स्वतः कलावती यांच्याकडून करण्यात आली आहे. मला मोदी सरकारच्या काळात काहीही मिळाले नाही, असे थेट कलावती यांच्याकडूनच सांगण्यात आले आहे. त्यानंतर आता त्यांनी अमित शहा यांनी माझ्याविषयी लोकसभेत खोटी माहिती दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणी बोलताना कलावती बांदुरकर म्हणाल्या की, अमित शहा यांनी माझ्याविषयी खोटी माहिती दिली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करावी. यासंदर्भातील निवेदन कलावती यांनी मारेगावच्या तहसीलदारांच्या मार्फत पंतप्रधान मोदींना पाठवले आहे. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते कलावती यांच्यासोबत निवेदन देण्यासाठी उपस्थित होते. त्यामुळे कलावती यांचे हे निवेदन पंतप्रधान मोदी यांच्यापर्यंत पोहोचते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Take action against Amit Shah, Kalawati Bandurkar demands to PM Narendra Modi)

- Advertisement -

गुरुवारी (ता. 10 ऑगस्ट) अमित शहा यांनी केलेल्या दाव्याबाबत बोलताना कलावती यांनी सांगितले की, मला भाजप सरकारने कुठलीच मदत आजपर्यंत केली नाही. माझ्या घरी 2008 मध्ये काँग्रेसचे राहुल गांधी आले. त्यानंतर घरी वीज नळ जोडणी, रेशन कार्ड, घरकुल आणि 30 लाखांची मुदत ठेव करून देण्यात आली. राहुल गांधी यांनी केलेल्या मदतीवर अजूनही घर सुरू असून भाजपकडून कोणतीही मदत देण्यात आलेली नाही. तर घरात जी गॅस आहे ती पण मी पैशाने विकत घेतली आहे. मोदी सरकारने गॅसही मोफत दिलेली नाही.

कोण आहेत कलावती?

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कलावती बांदूरकर कापूस वेचण्याचे काम करतात. 2005 मध्ये त्यांचे पती परशुराम बांदुरकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली. त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ देखील सुरू झाला. भारत जोडो यात्रेदरम्यान वाशीम येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती सोहळ्यात कलावती बांदूरकर यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आभार मानले होते.

काय म्हणाले होते अमित शहा?

एक नेता एका गरीब आई कलावतीच्या घरी जेवणासाठी गेला होता. इथे मागे बसून त्यांनी गरिबीचे तपशीलवार वर्णन केले. नंतर त्यांचे सरकार 6 वर्षे टिकले, मला विचारायचे आहे की त्या कलावतीचे काय झाले? कलावतींना घर, वीज, गॅस, शौचालय, धान्य, आरोग्य देण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले. त्या आजही मोदींच्या सोबत आहेत. राहुल गांधी यांचे 13 वेळा लाँचिंग झाले आणि ते अयशस्वी ठरले अशी टीका देखील अमित शहांनी केली.

- Advertisment -