मेनोपॉज काळात अशी घ्या स्वतःची काळजी

१०-१२ महिन्यांपासून मासिक पाळी न येणे यालाच मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती असे म्हणतात. ही समस्या ४५ ते ५५ वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये जास्त पाहायला मिळते. हा काळ वास्तवात स्त्रीच्या जीवनातील परिवर्तनकाळ असतो. मेनोपॉज होणे हे नैसर्गिक आहे, हा कोणता आजार नाही. परंतु मेनोपॉजनंतर अनेक स्त्रियांना जास्त त्रासाला तोंड द्यावे लागते. ज्यामुळे त्यांची दैनंदिन दिनचर्या बिघडते. अनेकदा मेनोपॉजमुळे स्त्रियांना मोठ्या गंभीर समस्येला सुद्धा सामोरे जावे लागते. असा त्रास झाल्यास त्यांनी त्वरित डॉक्टरांची भेट घ्यावी.

या कालावधीत अनेक स्त्रियांना मानसिक तणावाची समस्या येते. काही स्त्रियांमध्ये या कालावधीनंतर शरीरावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते. बहुतांश महिलांच्या शरीरात स्थूलता येते. मेनोपॉजवर उपचार म्हणून औषधे घेणे योग्य नाही. तसा सल्ला डॉक्टर सुद्धा देत नाही, कारण अशा वेळेस त्रास किती जास्त आहे त्यानुसार पुढील पाऊल उचलावे लागते. तरी लक्षणे वाढू लागल्यास प्राथमिक त्रास कमी व्हावा म्हणून तुम्ही डोकेदुखी वा तापाच्या गोळ्या घेऊ शकता. जास्तच त्रास झाल्यास डॉक्टरांना दाखवल्याशिवाय पर्याय नाही. मेनोपॉजच्या वेळेस शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येते. जर तुमच्या आहारातून, खाण्यातून तुम्हाला पुरेश्या प्रमाणात कॅल्शियम मिळत नसेल तर अश्यावेळेस सप्लीमेंट्सच्या माध्यमातून कॅल्शियमची ती त्रुटी भरून काढावी. हाडे कमजोर झाल्यास जर योग्य खबरदारी घेतली नाही तर दैनंदिन आयुष्यावर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो. आहारामध्ये पालेभाज्यांचे सेवन जास्तीतजास्त करा. भाज्या उकडून खाणे सुद्धा फायद्याचे ठरते. खारट, गोड किंवा आंबट पदार्थांचे सेवन शक्य तितके कमी करा. फायबरयुक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करा. प्रक्रिया केलेले वा तळलेले खाद्यपदार्थ खाऊ नका. डाएटीशियनकडून एक डाएट चार्ट बनवून घ्या. अशा प्रकारे तुम्ही मेनोपॉजमुळे उद्भवणार्‍या समस्यांपासून स्वत:चा बचाव करू शकता.

कोणत्याही व्याधीवर मात करायची असेल तर व्यायामासारखा दुसरा प्रभावी उपाय नाही. रोज अर्धा तास एरोबिक एक्सरसाईज आणि अन्य सामान्य व्यायाम करा. व्यायाम करून तुम्ही मांसपेशी, हाडं आणि त्वचेला मजबूत बनवू शकता. व्यायामाप्रमाणेच योगा देखील शरीराला तंदुरुस्त ठेवतो. व्यायामाला योगाची जोड असले तर व्याधी त्या व्यक्तीपासून दूरच असतात. म्हणून योगा केलाच पाहिजे. योग केल्याने शरीरात आवश्यक असलेली उर्जा निर्माण होते आणि मन ताजेतवाने होते. वर सांगितलेले सगळे उपाय करूनही तुम्हाला काहीच फरक दिसत नसेल तर डॉक्टरांची भेट घेणे. डॉक्टर तुम्हाला काही चांगली औषधे देतील त्यामुळे तुम्हाला या समस्यांपासून नक्कीच मुक्तता मिळेल. जर औषधे घेऊनही तुम्हाला बरं वाटत नसले तर गायनेकोलॉजिस्ट (Hormone Replacement Therapy (HRT) उपचार प्रणालीचा मार्ग अवलंबतात. या उपचारांमुळे तुम्ही नक्कीच सर्व समस्यांमधून मुक्त होऊ शकता.

डॉ. मानसी गुजराथी  (लेखक एम. डी. गोल्ड मेडलिस्ट आहे.)