Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ कायापालट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ कायापालट करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Story

- Advertisement -

महाबळेश्वरमधील पर्यटनाचा आराखडा तयार करताना कमी कालावधीतील प्रमुख कामे प्राधान्याने लगेच हाती घ्यावी. मुख्य बाजारपेठेचा तसेच वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करून पर्यटकांना तसेच स्थानिक लहान, मोठ्या व्यावसायिकांना चांगली सुविधा मिळेल आणि या भागाचा नियोजनबद्ध विकास होऊन आणखी लोकप्रियता वाढेल हे पाहावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित

महाबळेश्वर भागातील पर्यटनाचा विकास करण्यासंदर्भात आज वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री कुमारी अदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय महेता, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह हे ऑनलाईन उपस्थित होते.

ही कामे पहिल्या टप्प्यात हाती घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश 

- Advertisement -

यावेळी महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘महाबळेश्वरचा मास्टर पर्यटन आराखडा तयार करताना कमी कालावधी आणि दीर्घकालीन स्वरुपात करता येईल अशा कामाची वर्गवारी करावी आणि त्याची टप्पेनिहाय अंमलबजावणी करावी, असे करताना कमी कालावधीसाठी जी कामे तात्काळ हाती घेता येतील त्यावर लक्ष केंद्रित करावे. महाबळेश्वर मार्केट, रस्ता रुंदीकरण आणि लेक परिसर याची कामे जी तत्काळ सुरू करता येतील ती कामे पहिल्या टप्प्यात हाती घ्यावीत.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या या सूचना

पर्यटनाला दर्जा रहावा, पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात आणि त्या माध्यमातून पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी स्थानिकांना विश्वासात घेऊन ही कामे करावीत. विकास प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे. जे काम करू त्या कामाचे डिझाईन, काम सुरू होण्याची तारीख, संपण्याची तारीख, कामानंतर स्थळाचे बदलणारे आकर्षक स्वरूप दाखवणारे बोर्ड लावावेत. ही कामे झाल्यास पर्यटक वाढतील, पर्यायाने स्थानिकांना लाभ होईल हे त्यांना समजावून सांगावे. वन, पर्यावरण, पर्यटन विभागाने मिळून समन्वयाने महाबळेश्वर पर्यटन आराखड्याची कामे करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

- Advertisement -

महाबळेश्वरमध्ये पोलो मैदानाची जागा वन विभागाच्या ताब्यात आहे. त्याचे सपाटीकरण करणे आवश्यक आहे, पण त्यास केंद्रीय वन संवर्धन कायद्यांतर्गत केंद्र शासनाची मान्यता घ्यावी लागते, त्यामुळे नगर पंचायतीने हा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठवावा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. त्या मैदानाची लेव्हल केल्यास तिथे पोलो स्पर्धा आयोजित करता येतील. हे तिथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल.

वेण्णा लेक परिसर ३१ जानेवारीपर्यंत सुशोभित करावा. महाबळेश्वरमध्ये विविध प्रकारच्या पर्यटनाला मोठा वाव आहे. यात साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटन, हेरिटेज पर्यटन, धार्मिक आणि कृषी पर्यटन यासारख्या क्षेत्राचा समावेश करता येईल. आताच्या महाबळेश्वरमध्ये पहिल्या टप्प्यात मार्केट आणि लेक परिसराचे काम हाती घ्यावे. महाबळेश्वरमध्ये ५ एमएलटी पाणी क्षमता आहे, ती १९ एमएलटीपर्यंत वाढवता येऊ शकेल, त्यामुळे तलावाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव सादर करून त्यास मंजुरी घ्यावी. रस्त्याची रुंदी वाढून त्यात एकसमानता आणण्यास मदत होईल, अशा सूचना यावेळी दिल्या.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, ‘राज्याचा विकास करताना तो पर्यावरणपूरक व्हावा यावर भर दिला जात आहे. महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागाचा विकास करताना पर्यावरण संवर्धन आणि पर्यटनवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास याचा समतोल साधला जाईल हे पाहणे गरजेचे आहे. महाबळेश्वर पर्यटन मास्टर प्लॅनची यादृष्टीने अंमलबजावणी केली जाईल,’ असे ते म्हणाले. रस्ते, वाहतूक व्यवस्था, पदपथ, बाजारपेठ यांची रचना, तेथील रंगसंगती, पथदिवे, व्हर्टिकल गार्डन, रस्ते क्रॉसिंग, निर्मिती यांच्यात एकवाक्यता असावी. वाहतुकीचे व्यवस्थापन असावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.


हेही वाचा –  राज्यात ३,१४५ नवे रुग्ण, ४५ जणांचा मृत्यू


 

- Advertisement -