घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकर्ज काढा, कर वाढवा आणि शासकीय कंपन्या विका एवढंच मोदी सरकारच काम...

कर्ज काढा, कर वाढवा आणि शासकीय कंपन्या विका एवढंच मोदी सरकारच काम : पृथ्वीराज चव्हाण

Subscribe

के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे स्मृती व्याख्यानमालेत चव्हाण यांचे प्रतिपादन

नाशिक : भारतात धार्मिक व जातीय ध्रुविकरण वाढल्याने देशात नवीन उद्योग येण्यासाठी तयार नाहीत. त्यातच देशातील 10 हजार 756 विदेशी उद्योगांपैकी तब्बल 2700 कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला आहे. यातून बेरोजगारीचा धोका अधिक वाढला असून, राजकीय धोरणांच्या अस्थिरतेचा उद्योगधंद्यांना सर्वाधिक फटका बसल्याची चिंता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केली.

पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवारी (दि.3) गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ‘भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शिक्षण पध्दती समोरील भविष्यातील आव्हाने’ या विषयावर त्यांनी विचार व्यक्त केले. माजी खासदार प्रतापराव वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा साध्या, सोप्या शब्दात मांडला. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था 2.7 ट्रिलियन डॉलर इतकी आहे. मार्च 2023 ही अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर इतकी करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु, आताचा विकासदर पाहता ते अशक्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता 5 ट्रिलियनच्या अर्थव्यवस्थेचा मुद्दा सोडून दिला आहे. 140 कोटी लोकसंख्येच्या भारतात 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोक शेती करतात. ‘जीडीपी’मध्ये त्यांचा वाटा 16 टक्के तर, सेवा क्षेत्राचा 54 टक्के व उर्वरित उद्योगांचा वाटा आहे. देशाचा ‘जीडीपी’ सातत्याने घसरत असल्याने दरडोई दरमानसी उत्पन्नात जगात भारताचा 142 वा क्रमांक लागतो. जो बांगलादेशपेक्षाही खाली आहे.

- Advertisement -

चीनची अर्थव्यवस्था भारताच्या पाच पट मोठी असून भारत आता चीनची बरोबरी कधीच करू शकणार नाही. देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारने 27 लाख कोटींचे कर्ज घेतले आहे. जे भारताच्या एकूण जीडीपीच्या 86 टक्के इतके आहे. कर्ज घेतल्याचा परिणाम होत नाही; पण त्यालाही मर्यादा आहेत. म्हणून उत्पन्न वाढीसाठी करवाढ व शासकीय कंपन्यांची विक्री केली जात आहेे. धार्मिक ध्रुविकरणामुळे उदारमतवादी लोकशाहीला धोका संभवतो. निवडून दिलेली हुकुमशाही अशी मोदी सरकारची प्रतिमा होत असल्याने देशात लोकशाही जीवंत राहिल का? असा धोकाही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला. विद्यार्थी व प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. माजी खासदार प्रतापराव वाघ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव के. एस. बंदी, अजिंक्य वाघ आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -