घरमहाराष्ट्रशिवसैनिकांवरील हल्ल्यांची गंभीर दखल घ्या; शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस महासंचालकांची भेट

शिवसैनिकांवरील हल्ल्यांची गंभीर दखल घ्या; शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस महासंचालकांची भेट

Subscribe

महाराष्ट्र पोलीस मागील काही महिन्यांत गुजरात, आसाम, गोवा राज्यात अनेकदा गेले होते.  तेव्हा त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? असा सवालही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यावेळी केला

मुंबई : नाशिक, माथेरान, सांगली, डोेंबिवली यासह राज्यभरात शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांवर होणाऱ्या हल्ल्यांची गंभीर दखल घेण्यात यावी, अशीही मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना भेटून केली. त्यावर या सर्व प्रकरणांची दखल घेऊन कार्यवाही करण्याचे  आश्वासन रजनीश सेठ यांनी शिष्टमंडळाला दिले. महाराष्ट्र पोलीस मागील काही महिन्यांत गुजरात, आसाम, गोवा राज्यात अनेकदा गेले होते.  तेव्हा त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली होती का? असा सवालही शिवसेनेच्या शिष्टमंडळाने यावेळी केला.

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यातील विविध विषयांवर पोलीस महासंचालकांची भेट घेऊन त्यांना य निवेदन दिले. यावेळी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस मागील काही महिन्यांत अन्य राज्यांत अनेकदा गेल्याबाबतचा सवाल करताना त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेतली का? असा प्रश्न  विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी केला. यावर यासंदर्भात माहिती घेतली जाईल असे आश्वासन महासंचालकांकडून देण्यात आले.

- Advertisement -

त्याचप्रमाणे नाशिक येथील नीलेश सदाशिव कोकणे या शिवसेना कार्यकर्त्याला भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्याबाबत नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडून निवेदन देण्यात आले. त्याचप्रमाणे माथेरान येथील शिवसेना नेते प्रसाद सावंत यांना अज्ञाताने जीवे मारण्याची दिलेली धमकी, त्याचप्रमाणे ते कर्जतला जात असताना अज्ञात इसमांकडून प्रसाद सावंत यांच्यावर करण्यात आलेला हल्ला, शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांच्यावर हेतूपुरस्सर आरोप करून त्यांना झालेली अटक तसेच  औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एका महिलेला स्थानिक आमदारांकडून झालेला मारहाणीचा प्रकार या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना  खासदार अरविंद सावंत, आमदार अंबादास दानवे यांच्याकडून निवेदनाद्वारे करण्यात आली.

पुण्यातील हल्ला प्रकरणात शिवसैनिकांवर लावलेली अनावश्यक कलमे हटवा

पुणे शहरात कात्रज येथे २ ऑगस्ट रोजी उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे पदाधिकार्‍यांना अकारण पोलीस कोठडीत ठेवण्यात आले. जे पदाधिकारी तिथे उपस्थित नव्हते तरीही त्यांच्यावर ३०७, ३२२ सारखी कलमे लावण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात मूळ आरोपींना शोधून त्यांच्यावर कारवाई करा आणि शिवसैनिकांवर  लावलेली कलमे हटवा, अशी मागणी नीलम गोऱ्हे  आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्याकडून निवेदनाद्वारे महासंचालकांकडे करण्यात आली. पोलीस महासंचालकाना भेटलेल्या शिष्टमंडळात शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार अजय चौधरी, मनीषा कायंदे, संजना घाडी आदींचा समावेश होता.

- Advertisement -

हेही वाचाः ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी; लवकरच राहण्यास जाण्याची शक्यता

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -