‘काय’द्याचं बोला! लाचखोरीत नाशिक पोलीस अव्वल

साईप्रसाद पाटील । नाशिक

‘चिरीमिरी गुपगिळी’, ‘काय’द्याचं बोला!, असे एक ना अनेक विनोदी वाक्य आपण चित्रपटात ऐकले असावेत. मात्र, नाशिक पोलिसांच्या बाबतीत याचा प्रत्यय गेल्या दोन वर्षांपासून प्रकर्षाणे येतोय. याचे कारणही तसेच म्हणावे लागेल. उत्तर महाराष्ट्राचा विचार केला, तर लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये नाशिक जिल्हा गेल्या दोन वर्षांपासून अव्वल स्थान टिकवून आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत झालेल्या १० लाचखोरीच्या प्रकरणांत एकट्या नाशकात ५ लाचखोर गजाआड झाले. त्यापाठोपाठ अहमदनगर, धुळ्याचा नंबर लागतो.

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे आर्थिक शोषण टळावे, त्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कंबर कसून कारवाई करत असताना दुसरीकडे संपूर्ण राज्यभरातच लाचखोरीची पाळेमुळे खोलवर रुजत असल्याचे दिसून येत आहेत. अशा स्थितीत प्रशासनाच्या विविध विभागांत कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक ‘पोलीस दादा’च चिरीमिरीच्या प्रकरणांत टॉपमध्ये असल्याचे विदारक चित्र आहे. खेदजनक बाब म्हणजे, लाचखोरीसंदर्भात सर्वसामान्यांना लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार करावी लागते, तरच कारवाई होते. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनाच खाकीतील गैरव्यक्तींवर कारवाईसाठी पुढाकार घ्यावा लागतोय.

सद्यस्थितीचा विचार केल्यास नाशिक जिल्हा लाचखोरीत संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात टॉपवर असल्याचे धक्कादायक चित्र आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये लाचखोरीसंदर्भातील तक्रारींसाठी ५६ वेळा सापळे रचावे लागले, यात ३६ लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात यशही आले. परंतु, दुर्दैव म्हणजे यात एकट्या नाशिकच्याच १२ पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना ताब्यात घेण्यात आले. यानंतर अहमदनगरमध्ये ६, धुळ्यात चार, तर जळगावमध्ये ३ आणि नंदूरबारमध्ये २ लाचखोर ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर २०२२ मध्ये झालेल्या कारवायांकडे पाहिल्यास निम्मे वर्ष सरत नाही तोच १० लाचखोर ट्रॅप झाल्याचे दुर्दैवी चित्र आहे. यातही नाशिक टॉपवर असून, येथील पाच अधिकारी, कर्मचार्‍यांना अटक करण्यात आली. त्याखालोखाल नगर आणि धुळ्याचे प्रत्येकी दोन, तर जळगावच्या एका पोलिसाला लाच घेतल्याबद्दल ताब्यात घेण्यात आले आहे.

कुंपणच शेत खात..!’

बहुतांश प्रकरणांत सर्वसामान्यांकडून न्यायाची अपेक्षा केली जाताना पोलीस दलातील काही भ्रष्ट अधिकारी, कर्मचार्‍यांकडून मात्र ‘किती देणार’ असा उलटप्रश्न केला जातो, हे दुर्दैवी वास्तव आहे. मूळात अनेकदा फिर्यादीकडूनच पैसे लाटल्याची प्रकरणे अनेकदा समोर आली आहेत. आरोपींकडून तर अपेक्षा होतेच पण फिर्याददरालाच वेठीस धरले जात असेल, तर कायद्याच्या रक्षकांकडून आणखी अपेक्षा काय करायची, अशा संतप्त प्रतिक्रियाही काही प्रकरणांमध्ये व्यक्त केल्या गेल्या.

 

पोलिसांसह विविध विभाग मिळून एकूण आकडेवारी अशी :
नाशिक : ४०, नगर : ३५, जळगाव : ३३, धुळे : १४,  नंदूरबार : ७

 

कुठल्याही विभागातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सतर्क आहेच. तक्रार येताच कारवाईची दखल घेतली जाते. अशावेळी दोषी लाचखोरांवर नामुष्कीची वेळ येते, शिवाय समाजात नाचक्कीही होते. नोकरीवरही गदा येते. हे सर्व प्रकार वारंवार लक्षात आणून देऊनही लाचखोरी होते, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. मात्र, हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असून, अधिक कठोरात कठोर कारवाई यापुढेही केली जाईल. : सुनील कडासने, अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

 

मुख्यालय असल्याने ट्रॅपची संख्या मोठी दिसणे स्वाभाविक आहे. परंतु, नाशिकमध्ये कुठेही लाचखोरीचे प्रकार घडू नयेत, यासाठी प्रयत्नशील आहोत. वाढते प्रकार पाहता मुंबईच्या धर्तीवर नाशकातही ट्रॅपमध्ये अडकणार्‍या अधिकारी, कर्मचार्‍याबाबत तातडीने चौकशी केली जाणार आहे. मी स्वत: लक्ष घालून आहे, शिवाय प्रत्येक पोलीस निरीक्षकांवरही याची विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. कर्मचारी, अधिकार्‍यांचे वेळोवेळी समुपदेशन केले जात आहे. : जयंत नाईकनवरे, पोलीस आयुक्त, नाशिक