घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुले पळवणार्‍या टोळीच्या चर्चेने सर्वदूर अफवांचे पीक जोमात

मुले पळवणार्‍या टोळीच्या चर्चेने सर्वदूर अफवांचे पीक जोमात

Subscribe

नाशिक : शहरासह जिल्ह्यात लहान मुलांचे अपहरण करणार्‍या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. काही टोळ्या नाशिक शहरातील विविध भागात फिरुन लहान मुलांना पळवून नेत आहेत, असे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी शहानिशा केली असता ही फक्त अफवा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

१३ सप्टेंबर रोजी ब्लँकेट विकणारे दोन तरुण उपनगरमध्ये आले होते. नागरिकांनी त्यांना घरी बोलावले असता ते घरात गेले. त्यावेळी लहान मुलाने त्यांचे ब्लँकेटचे कव्हर खेळताना खेचले. त्यावरुन ब्लँकेट विकणारे व खरेदी करणार्‍या ग्राहकामध्ये वाद झाला. त्यावेळी नागरिकांनी ११२ वर कॉल करुन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत दोघांना ताब्यात घेतले. पोलीस तपासात दोघे जण नाशिकमधील असल्याचे समोर आले. तर किरकोळ वाद झाल्याने गैरसमजातून प्रकार घडला.

- Advertisement -

कोणार्क नगर येथून सहा लहान मुलांचे अपहरण करण्यात आले आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. लहान मुलांना एकटे कोठेही सोडू नये, असा मेसेज व्हायरल झाला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, आडगाव पोलीस ठाणे यांनी शहानिशा केली असता कोणताही प्रकार घडला नसल्याचे समोर आले.

२३ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजेदरम्यान अरबाज शेख (वय २१) याने शूज, जिन्स पॅन्ट व शर्टवर बुरखा परिधान केल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांना संशय आल्याने त्यांनी त्यास पकडले. त्यावेळी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वाहन पोलीस निरीक्षकांना सोडून चालक व आरटीपीसी परत जात होती. गर्दी दिसल्याने पोलिसांनी तरुणास ताब्यात घेत इंदिरानगर पोलीस ठाण्यात आणले. प्रत्यक्षात तो मित्र इरफान पठाणची चेष्ठा करण्यासाठी बुरखा घालून महिलेचा आवाज काढून त्यास वडाळागाव, जॉगींग ट्रॅकवर बोलावून घेतले होते. त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांना त्याच्या पायातील स्पोर्ट शूज बघून तो पुरुष असल्याचे दिसले. तो लहान मुले चोरणार आहे, असे समजून त्यास नागरिकांनी शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी मारहाण करणार्‍या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

२३ सप्टेंबर रोजी संजय येवले हे कारने गंजमाळ परिसरात आले. ते किराणा सामान घेतल्यानंतर परत घराच्या दिशेने जात होते. त्यावेळी अनोळखी एका तरुणाने त्यांना कारच्या नंबर प्लेटवर लाल रंग पडत असल्याचे सांगितले. त्यानुसार येवलेंनी कारचा वेग कमी केला. त्यावेळी दुसर्‍या तरुणाने त्यांच्या कारमधून बॅग काढण्याचा प्रयत्न केला. ही बाब येवलेंच्या लक्षात येताच दोघांनी पळ काढला. नागरिकांनी त्यांना पाठलाग करुन पकडले. दोघेही चोरटे असल्याचे समोर आले. मात्र, परिसरात लहान मुले पळविणारे असल्याचे नागरिकांनी त्यांना मारहाण केली.

या कारणांमुळे अपहरणांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ

१८ वर्षांखाली मुले व मुली प्रेमप्रकरण किंवा कौटुंबिक कारणातून पळून जात आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे अपहरणांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रत्यक्षात ही मुले व मुली हरविलेले असतात. याप्रकरणी अपहरणाचे गुन्हे दाखल होत असल्याने बालकांचे अपहरण होत असल्याचा चुकीचा समज होत आहे. नाशिक शहरात मुलांना पळवून नेणारी टोळी फिरत आहे, हा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज बनावट आहे.

जिल्ह्यात लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरवली जात आहे. जिल्ह्यात मुले पळविणारी टोळी सक्रिय नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. : सचिन पाटील, पोलीस अधीक्षक

नागरिकांना आवाहन 

  • नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी पडू नये.
  • अफवा पसरविणार्‍या आणि मारहाण करणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.
  • संशयास्पद व्यक्तींविरुद्ध शंका असल्यास अनोळखीला मारहाण न करता ११२, नियंत्रण कक्ष 0253-2305233 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

मुले १८ पेक्षा लहान असल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. शहरात मुले पळविणारी टोळी सक्रिय नाही. टोळी सक्रिय असल्याचा अफवा पसरविल्या जात आहेत. त्यातून अनोळखी व्यक्तीला मारहाण केली जात आहे. कायदा कोणीही हातात घेवू नये. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. पोलीस तात्काळ घटनास्थळी येतील. पोलीस खातरजमा करुन आवश्यक ती कारवाई करतील. : अमोल तांबे, पोलीस उपायुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -