Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराबाबत तानाजी सावंतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, फडणवीसांच्या आदेशाने...

राज्यातील सत्तांतराबाबत तानाजी सावंतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, फडणवीसांच्या आदेशाने…

Subscribe

मुंबई – शिवसेनेत फूट पडल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात सत्तांतर घडून आले. परंतु, या अनाकलनीय सत्तांतरामागे कोणाचा छुपा पांठिबा होता हे उघड झालेले नाही. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. या बंडामागे फडणवीसांचा हात होता, असा दावा तानाजी सावंत यांनी केला आहे.

तानाजी सावंत म्हणाले की, ” सरकार सत्तेत आल्यानंतर ३० डिसेंबर २०१९ ला मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ३ जानेवारी २०२० च्या आसपास सुजितसिंह ठाकूर आणि मी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने तमाम महाराष्ट्रात पहिल्यांदा बंडखोरी केली. धाराशिव जिल्हा परिषद शिवसेना-भाजपची, जे साडेबारा कोटी जनतेने मँडेट दिलं होतं, ती सुरुवात या ठिकाणाहून केली, ही वस्तुस्थिती आहे. त्या वेळी बंडाचं निशाण फडकवणारा तानाजी सावंत होता. मी तेवढ्यापुरता थांबलेलो नव्हतो. ज्यांना इशारा द्यायचा होता, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मातोश्रीवर जाऊन हात करून सांगितलं, की परत या मातोश्रीची पायरी चढणार नाही आणि हे सरकार उलथवल्याशिवाय तानाजी सावंत गप्प बसणार नाही.”

- Advertisement -

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांच्यात तब्बल १०० ते १५० बैठका झाल्याचाही गौप्यस्फोट तानाजी सावंत यांनी यावेळी केला.

राज्यात सत्तांतर घडत असताना शिवसेनेचे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटी येथे होते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय पटलावर पुढचा अंक कोणता असणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. त्याच काळात एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओनुसार त्यांच्या मागे महाशक्तीचा हात असल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलं होतं. परंतु, या सत्तांतरामागे भाजपाचा पाठिंबा होता हे अद्यापही समोर आलेले नाही. परंतु, शिंदे गटात गेलेल्या अनेक नेत्यांच्या वक्तव्यांवरून यामागे भाजपाचाच हात असल्याचं स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तानाजी सावंत यांना मंत्रीपद मिळालं नव्हतं. त्यामुळे ते नाराज असल्याच्या सतत वावड्या उठायच्या. तसच, अनेकदा तानाजी सावंत यांनी सत्तेत असतानाही महाविकास आघाडीविरोधात भूमिका जाहीर केली होती. तानाजी सावंत यांची ही अस्वस्थता देवेंद्र फडणवीसांनी हेरली असावी आणि बंडासाठी त्यांना सावज केलं असावं अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. तानाजी सावंतप्रमाणेच नाराज आमदारांना एकत्र करून बंडाचे नियोजन आखले गेले असेल असंही म्हटलं जात आहे.

- Advertisment -